औरंगाबाद : पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर बलात्काराचा आरोप करून गायब झालेली पीडिता चार दिवस उलटल्यानंतरही पोलिसांना सापडत नाही. दुसरीकडे तरुणीचा जबाब झाल्यानंतरच श्रीरामे यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हिमायतबाग परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने श्रीरामे यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार पोलीस आयुक्तालयाच्या व्हॉटस्अॅप क्रमांकावर पाठविली होती. २१ जून रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर शहानिशा करण्यासाठी ती महिला तक्रार निवारण मंचकडे देण्यात आली. महिला तक्रार निवारण मंचच्या पोलिसांनी पीडितेला बोलावून घेतले. व्हॉटस्अॅपवरील पाठविलेली तक्रार तिचीच असल्याबाबत तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी पीडितेने ती तक्रार तिनेच पाठविल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. नंतर त्या तक्रारीच्या अर्जावर तिने स्वाक्षरी केली. त्यावेळी तिला एमआयडीसी सिडको ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी येण्याचे पोलिसांनी सांगितले; मात्र तेव्हापासून पीडिता गायब असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शेवटी २६ जून रोजी याप्रकरणी तिच्या परस्पर पोलिसांनी उपायुक्तांविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला. हा गुन्हा नोंदवून शुक्रवारी चार दिवस उलटले; मात्र अद्यापही ती पोलिसांसमोर आली नाही. तिला शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने तिच्या घरी अनेकदा चकरा मारल्या; मात्र ती घरी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर पीडितेच्या मोबाईल क्रमांकावर अनेकदा फोन करून आणि मेसेज पाठवून एमआयडीसी सिडको ठाण्यात येण्याचा निरोप तिला देण्यात आला; परंतु ती अद्यापही जबाब देण्यासाठी आली नसल्याचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितले.
यू-ट्यूबवरील क्लीप व्हायरलपोलीस उपायुक्तांवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारा पीडितेचा व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आल्याचे समोर आले. यू-ट्यूबवरील ही क्लीप व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून विविध ग्रुपवर गुरुवारी रात्रीपासून व्हायरल झाली. या क्लीपमध्ये पीडितेने चेहरा झाकलेला आहे. यामुळे उपायुक्तांवर आरोप करणारी तीच पीडिता आहे अथवा नाही, हे स्पष्ट होत नाही. असे असले तरी हा व्हिडिओ यू-ट्यूबवर कोणी अपलोड केला, याबाबतचा शोध सायबर क्राईम सेल घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.