लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : गेल्या चार दिवसांपासून आष्टी शहर व परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरी करण्याचे धाडस चोरटे करीत असले तरी त्यांना पकडण्याचे धाडस पोलिसांनी अद्यापही दाखविलेले नाही. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संशय व्यक्त होत आहे. आष्टीमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आष्टी तालुक्यातील खडकत येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत शटर तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला; परंतु सायरन वाजल्याने चोरांनी तेथून पळ काढला. त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर सोमवारी पहाटेच आष्टी शहरातील सावतामाळी भागात राहणारे सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून रोख रक्कम पावणेतीन लाख रूपये व १७ तोळे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. पुन्हा मंगळवारी पहाटे शहरातील वडार गल्ली भागात असणाऱ्या कालिकादेवी मंदिरालाच चोरट्यांनी टार्गेट करीत देवीच्या अंगावरील साडेचार तोळे सोने चोरट्यांनी पळविले. सलग तीन दिवस तीन चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन घटना घडल्या तरी पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला पकडलेले नाही. त्यांमुळे संशयाची सुई पोलिसांच्या दिशेने जात आहे.
आष्टीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोऱ्या
By admin | Published: June 28, 2017 12:36 AM