छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर धावणाऱ्या अनेक खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर ‘पोलिस’ आणि पोलिस ‘बोधचिन्ह’ नमूद केलेले दिसते. अशा वाहनांवर आता आरटीओ कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील खासगी वाहनांवर ‘पोलिस बोधचिन्ह’ आणि ‘पोलिस’ लिहणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी परिवहन विभागाकडे एका व्यक्तीकडून करण्यात आली. या तक्रारवजा मागणीची गंभीर दखल घेत परिवहन विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यात ‘पोलिस’ लिहिणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांना तपासणीदरम्यान अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
‘महाराष्ट्र शासन’ची पाटीही पडेल महागातखासगी वाहनात ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी किंवा बोधचिन्हांचा वापर केल्यास त्यावरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अशी पाटी चांगलीच महागात पडणार आहे.