छत्रपती संभाजीनगर : सिल्लेगाव परिसरात बंदोबस्ताचे कर्तव्य पूर्ण करून करमाडच्या दिशेने निघालेले पोलिस अंमलदार अमोल मारकवाड (३१) यांना एका मद्यधुंद रिक्षाचालकाने विनाकारण मारहाण करून त्यांचा गणवेश फाडला. महेश सुनील महाकाळे असे त्याचे नाव असून, त्याच्यावर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारकवाड करमाड ठाण्यात कार्यरत आहेत. सिल्लेगाव परिसरातील बंदोबस्त आटोपून ते करमाडच्या दिशेने जात होते. रात्री ८:३० ते ९ वाजेदरम्यान सिडको चौकात भावाला सोबत घेऊन जाण्यासाठी वाट पाहत उभे होते. तेव्हा अचानक महेशने त्यांच्याजवळ जाऊन झटापट सुरू केली. दुचाकीची चावी काढून फेकून दिली. येथे का थांबलाय, असे म्हणत हाताचापटीने मारहाण केली. त्यांच्या मदतीसाठी धावलेल्यांनादेखील त्याने मारहाण केली. त्यानंतर मारकवाड उपचारासाठी रुग्णालयात गेले. बुधवारी दुपारी त्यांनी सिडको ठाण्यात तक्रार दिल्यानंतर महेशवर गुन्हा दाखल करण्यात आला.
रिक्षाचालकही गुन्हेगारी वृत्तीचाआरोपी महेश हा रिक्षाचालक असून गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर यापूर्वी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे उपनिरीक्षक अनिल नानेकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या २० दिवसांतील शहरात पोलिसांवर हल्ल्याची ही पाचवी घटना आहे.