औरंगाबाद : मावळत्या पोलीस अधीक्षकांनी काही दिवसांपूर्वीच ग्रामीण पोलीस दलातील विविध सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली केली होती. आता नवनियुक्त पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी त्यातील तब्बल १२ अधिकाऱ्यांची थेट फील्डवर बदली केली आहे.
राज्य शासनाने पोलीस दलातील प्रस्तावित बदल्या केल्यानंतर औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातही तत्कालीन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने अनेक फेरबदल करण्यात आले होते. यास काही कलावधी उलटल्यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी झालेल्या आस्थापना विभागाच्या बैठकीत १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. यातील तब्बल ११ अधिकारी नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्या सर्वांना विविध कामांच्या ठिकाणी पाठविण्यात आले. नियंत्रण कक्षातून बदली झालेल्यांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांची अर्ज चौकशी, अशोक चौरे यांची गंगापूर पोलीस ठाणे, राजेंद्र बनसोडे सिल्लोड शहर, अर्चना पाटील यांची महिला तक्रार निवारण केंद्र याठिकाणी बदली केली. उपनिरीक्षक प्रदीप ठुबे यांची चिकलठाणा येथून स्थानिक गुन्हे शाखा, अशोक रगडे यांची नियंत्रण कक्षातून चिकलठाणा, अशोक जावळे यांची महिला तक्रार निवारण केंद्रातून उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाचक, बाबासाहेब बनसोडे यांची नियंत्रण कक्षातून करमाड, योगेश पवार यांची शिऊर, शरद वाहुळे यांची सिल्लोड शहर, रणजित कासले यांची फर्दापूर आणि योगश खटाणे यांची चिकलठाणा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचा आदेशही अधीक्षक गाेयल यांनी दिला आहे.