औरंगाबाद : तालुक्यातील पोलीस पाटील भरती ‘आरोपां’च्या विळख्यात आली आहे. तोंड पाहून गुण देणे, राजकीय दबावानुसार निवड करणे, निवडीसाठी आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारींमुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तालुक्यातील ८८ गावांत पोलीस पाटील निवडीसाठी लेखी व तोंडी परीक्षा झाली. ११ उमेदवार परीक्षेसाठी अपात्र ठरले आहेत. ६९ उमेदवारांच्या तोंडी परीक्षा झाल्या. त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना निवडीचे पत्र देण्यात येणार आहे, असे तालुका उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. भरतीप्रकरणी आलेल्या तक्रारींबाबत हदगल म्हणाले, २६ गावांतून तक्रारी आल्या आहेत. तक्रारींची सुनावणी घेण्यात येणार आहे. काही तक्रारी जागेवरच फेटाळण्यात आल्या आहेत.काही तक्रारींबाबत पुरावे मागविण्यात आले आहेत. जास्त अपत्य असल्याच्या, रहिवासी दुसऱ्या गावांतील असल्याच्या बहुतांश तक्रारी आहेत. जातीनिहाय आरक्षणावरूनही काही तक्रारी आल्या आहेत. आर्थिक व्यवहाराचे आरोप होत आहेत, यावर हदगल म्हणाले, पोलीस उपविभागीय अधिकारी, आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, तहसीलदार यांची कमिटी होती. पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे झाली आहे. तोंडी परीक्षेत गुण कमी दिल्याच्या तक्रारी आहेत. परंतु तोंडी परीक्षेतील गुणांबाबत न्यायालयात आजवर अनेक प्रकरणे गेली; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. बोरगाव, बनवाडी, लाडगाव या भागातील उमेदवारांना समान गुण मिळालेले आहेत. याबाबत निर्णय घेणे बाकी आहे. तोंडी परीक्षेच्या गुणांबाबत काही बदल होईल, असे वाटत नाही. निवडीच्या निकषातच पूर्ण प्रक्रिया पार पडली आहे.
पोलीस पाटील भरती वादात...
By admin | Published: March 15, 2016 12:32 AM