- राजेश भिसे
औरंगाबाद : मुदत संपलेल्या व कुठलीही कागदपत्रे नसलेल्या रिक्षा अवघ्या दहा ते वीस हजार रुपयांमध्ये बॉण्डद्वारे खरेदी करून प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यांवर आणल्या जात आहेत. मुकुंदवाडी भागात वास्तव्यास असलेल्या औरंगाबाद पोलीस दलातील कर्मचाऱ्याकडे अशा तब्बल ५० कालबाह्य रिक्षा असल्याचे समजते. आरटीओ कार्यालयाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईतील एका रिक्षावरून हे उघडकीस आले.
कोणत्याही रिक्षाचे आयुर्मान हे शासन निर्णयानुसार कमाल २० वर्षे असते. त्यानंतर हे वाहन सार्वजनिक वापरासाठी योग्य नसते, तर रिक्षासाठी आरटीओ कार्यालयाचे परमिट लागते. नवीन परमिटसाठी दहा हजार रुपये शुल्क आकारले जाते; परंतु या परमिटचे ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करणे अनिवार्य असते. ते न केल्यास परमिट रद्द समजले जाते, तर रिक्षाचा विमा व फिटनेस सर्टिफिकेटशिवाय परमिट नूतनीकरण करता येत नाही. त्यामुळे सध्या असंख्य परमिट हे नूतनीकरणाअभावी रद्द झाले आहेत. मात्र, या परमिटच्या नावावर आयुर्मान संपुष्टात आलेल्या रिक्षा रस्त्यांवर धावत आहेत. या रिक्षांची मुदत संपलेली असताना ‘स्क्रॅप’ न करता काही व्यक्ती ‘बॉण्ड’वर या रिक्षा घेत आहेत. या रिक्षांतून प्रवाशांची वाहतूक केली जात असून, यात सामान्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. शहरात आरटीओ कार्यालयातर्फे अनधिकृत रिक्षांवर कारवाईची मोहीम सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत अशीच कालबाह्य रिक्षा (एमएच-२० एए-२६८०) आरटीओ कार्यालयात लावण्यात आली. या रिक्षाचे आयुर्मान संपले असून, परमिटही एका महिलेच्या नावावर असल्याचे आरटीओच्या संकेतस्थळावर दिसून आले. या रिक्षा वापराची मुदत २७ फेब्रुवारी २०१७ रोजी संपली आहे, तर याचा कर हा ३१ डिसेंबर १९९९ पर्यंतच भरण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा किती कालबाह्य रिक्षा शहरातील रस्त्यांवर धावतात, याची आकडेवारी आरटीओ कार्यालयाकडेही उपलब्ध नाही.
आरटीओ कार्यालयाच्या दस्तावेजानुसार या रिक्षा कालबाह्य झालेल्या आहेत. मात्र, वाहनाची कागदपत्रे, विमा, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट आदी कागदपत्रे नसतानाही या रिक्षा खुलेआमपणे रस्त्यांवर धावत आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्याने जवळपास ५० कालबाह्य रिक्षा बॉण्डद्वारे खरेदी केल्या असल्याची चर्चा आरटीओ कार्यालय परिसरात सुरू आहे. जप्त केलेल्या रिक्षाच्या चालकाने ही माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. हा कर्मचारी कुठे कार्यरत आहे, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरटीओच्या पथकाने याची सखोल चौकशी करण्याची गरज रिक्षाचालक व मालक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
कारवाई करण्याची गरजकालबाह्य रिक्षा रस्त्यावर आणून सामान्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर आरटीओंनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. रिक्षांना क्यूआर कोड स्टीकर्स बसविण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी अशा रिक्षा शोधून त्यांच्या मालकांना दंड ठोठावून जरब बसवावी, तरच असे अवैध प्रकार बंद होतील.-निसार अहमद खान, अध्यक्ष, रिक्षाचालक मालक कृती समिती महासंघ, औरंगाबाद
प्रामाणिक रिक्षा चालकांचे नुकसानकालबाह्य रिक्षा रस्त्यांवर धावत असल्याने प्रवासी भाडे कमी आकारून वाहतूक केली जात आहे. सर्व कागदपत्रे, विमा, परमिट आदींसाठी खर्च करून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांचे या चुकीच्या प्रकाराने नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया एका रिक्षाचालकाने दिली.
तपासणी करण्यात येईल शहरात अवैध रिक्षांवरील कारवाईदरम्यान जप्त केलेल्या रिक्षांची कागदपत्रे अद्याप तपासण्यात आलेली नाहीत. ती तपासावी लागतील. त्यानंतरच याबाबत सविस्तरपणे सांगता येईल. - रमेशचंद्र खराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद