वडोद बाजार : फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकत पाच मोटारसायकल, सात मोबाईलसह एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद पवार, पोलीस नामदेव इचूलकुंडे, योगेश चेळेकर, शेख इलियास यांनी केलेल्या या कारवाईत नऊ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाहेगाव परिसरात जुगार सुरू असल्याचे माहिती झाल्यानंतर पोलिसांना गुरूवारी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्या वेळेस तेथे इम्रान पठाण (२९, रा. फुलंब्री), सचिन तुकाराम गंगावणे (३०, रा. फुलंब्री), कारभारी श्रीखंडे (४८, रा. वाहेगाव), ज्ञानेश्वर तातेराव राऊत (४६, रा. निधोना), सज्जन भगवान सूर्यवंशी (३५, रा. गौरपिंपरी, तालुका कन्नड), बापूराव विष्णू बिरारे (४६, रा. निधोना), फुलसिंग मनसिंग राजपूत (६६, रा. लालवण), गणेश नरसिंग जाधव (४२, रा. वावना), एकनाथ भिकाजी बनसोड (५२, रा. म्हाडा कॉलनी, औरंगाबाद) हे झन्ना मन्ना जुगार आणि पत्ते खेळताना आढळले. या सर्व आरोपींकडून पाच मोटारसायकल व सात मोबाईलसह एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.