म्हैसमाळ बनले आंबटशौकिनांचा अड्डा
पोलिसांची जुजबी कारवाई
खुलताबाद : पोलिसांनी शनिवारी दुपारी म्हैसमाळ येथील आर्य हॉटेलवर छापा टाकला असता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल उघडी ठेवल्याने हॉटेल चालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर हॉटेलसमोर रोडवर तीन महिला येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांना अश्लील हावभाव व इशारे करून खुणवत असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई केली आहे.
या कारवाईबाबत मात्र नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे. कारण पोलिसांनी छापा टाकला तेव्हा महिला हॉटेलमध्ये सापडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परंतु, म्हैसमाळ येथील वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलचालकांना अभय देण्यासाठी पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने गुन्हा नोंदवला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हैसमाळ येथील दोन हॉटेलवर खुलताबाद पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रास वेश्याव्यवसाय सुरू असून पर्यटक, भाविक व ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. मात्र थातूरमातूर कारवाई केल्यानंतर परत हा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू असतो. याकडे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. म्हैसमाळ हे गाव धार्मिक व पर्यटनस्थळाबरोबरच अवैध धंद्यासाठी नावारूपाला आले असून, या ठिकाणी दोन हॉटेलवर सर्रास वेश्याव्यवसाय सुरू आहे. या ठिकाणी औरंगाबाद येथून दोन रिक्षातून महिला येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.