औरंगाबाद : घरातून रुसून निघून गेलेल्या १३ वर्षांच्या मुलीला भोपाळला जाण्याआधीच क्रांतीचौक पोलिसांनी झटपट कारवाई करून शोधून काढले आणि नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
नागेश्वरवाडी येथील रहिवासी महिलेने १० जून रोजी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून त्यांची १३ वर्षांची मुलगी घरातून निघून गेल्याचे सांगितले. तिला गांधीनगर येथील मुलाने पळवून नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. यानंतर रात्री तिचा शोध घेतला; मात्र पोलिसांना फारशी माहिती मिळू शकली नव्हती. शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिता बागुल, सहायक उपनिरीक्षक कुलकर्णी, हवालदार जाधव, सुखदाने यांच्या पथकाने तिचा शोध सुरू केला असता, ती मुलगी मिलकॉर्नर येथील मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाकडे पैसे नेण्यासाठी येणार आहे. ती तिच्या मैत्रिणीसोबत भोपाळला जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी मिलकॉर्नर येथील मिठाई दुकानाबाहेर सापळा रचून सायंकाळी त्या मुलीला मैत्रिणीसह ताब्यात घेतले. यानंतर तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
ती मुलगी अनाथ आश्रमातीलघरातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या मुलीला बालपणी तिच्या विद्यमान आई-वडिलांनी दत्तक घेतले होते. तिचे वडील वृद्ध आहेत. ती वाईट संगत असलेल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून तिच्यासोबत पळून जाणार होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिला काहीही वाटले नाही. शिवाय गेले काही दिवस ती ज्या मुलांच्या संपर्कात होती, त्यांचाही पोलिसांनी शोध सुरू केला.