औरंगाबाद : २५ लाख रुपये कर्ज काढून देण्याच्या आमिषाने ४ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्याविरुद्ध तक्रार करून महिनाभरानंतरही पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे हताश झालेल्या तक्रारदाराने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना पदमपुरा येथे मंगळवारी सकाळी समोर आली. वेदांतनगर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला.
सुरेश शेकूजी पाटील (५२, रा. सुयोग कॉलनी, पदमपुरा) असे मृताचे नाव आहे, तर संजय गोविंदराव साबळे (रा. शिवराई, ता. गंगापूर) आणि त्याचा पुतण्या प्रफुल्ल नंदू साबळे (रा. भवानीनगर), अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. मृत पाटील हे डिजिटल बॅनर जाहिरात करणाऱ्या खाजगी कंपनीत व्यवस्थापक होते. दोन मुलींचा विवाह केल्यापासून पाटील आर्थिक अडचणीत होते. आरोपी संजय साबळे एकदा पाटील यांच्या घरी आला व त्याचे भाऊजी शिर्डीतील बँकेचे संचालक असून, २५ लाख रुपये कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ५ लाख रुपये खर्च येईल, असेही त्याने सांगितले. पाटील यांनी तयारी दर्शविताच आरोपीने २ कोरे धनादेश, २ फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतले.
साबळेने त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार रुपये नेले. तो पैसे नेण्यासाठी त्याचा पुतण्या प्रफुल्ल यास पाठवीत असे. पाटील यांनी क्रेडिट कार्डमधील ६२ हजार रुपये दिले. गुगल-पे, फोन-पेद्वारे १ लाख ५३ हजार रुपये आणि ५० हजार रुपये रोखीने दिले; पण कर्ज मंजूर झाले नाही. यामुळे पाटील यांनी पैसे परत मागितले. शेवटी त्यांनी छावणी विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात दि.७ आॅगस्टला आणि वेदांतनगर ठाण्यातही अर्ज दिला.
विष प्राशन करून संपविले जीवनपाटील यांचा अर्ज हवालदार तडवी यांच्याकडे चौकशीसाठी होता. पोलिसांनीही अर्जानुसार आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला नाही. यामुळे पाटील यांनी सोमवारी (दि.१४) बाथरूममध्ये विष पिले. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांचा निष्काळजीपणा; नातेवाईकांचा आरोप वेदांतनगर पोलिसांनी तडकाफडकी कारवाई केली असती तर पाटील आज जिवंत असते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या अर्जाबाबत निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप पाटील यांचे भाऊ विलास पाटील यांनी केला.
मरण पावल्यावर पाठविली एमएलसीपाटील यांना घाटीत दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या घटनेची माहिती (एमएलसी) तातडीने पोलिसांना दिली नाही. त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. यामुळे त्यांचा मृत्यूपूर्व जबाब पोलिसांना नोंदविता आला नाही.
मृत्यूनंतर नोंदविला गुन्हा तक्रारदाराचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी संजय साबळे आणि प्रफुल्ल विरुद्ध मृताच्या मुलाची तक्रार नोंदवून घेत गुन्हा नोंदविला.