औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. कारवाईच्या भीतीने अनेक रिक्षाचालकांनी घरीच राहणे पसंत केले तर हातावर पोट घेऊन फिरणाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा दामदुपटीत प्रवाशांना रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा फेऱ्या मारल्या. तर, रविवारी रेल्वेची परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठीही वाहनं मिळेना अशी परिस्थिती होती. शहरातील एका तरुणीच्या मदतीला पोलीस शिपाई धावून आले अन् तिला परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवले.
कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने पुन्हा कडक पाऊले उचलून लॉकडाऊनची घोषणा केली. ११ मार्चपासून रात्रीची संचारबंदी लागू केली असून, शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस लॉकडाऊन केले आहे. त्यातील शनिवारी रस्त्यावरील रहदारी पूर्णत: ओसरलेली दिसत होती. कारणास्तव वाहने फिरताना आढळून येत होती. अत्यंत महत्त्वाचे असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच राहून कोरोनाच्या साखळीला तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
रेल्वे स्थानक किंवा बसस्थानकावर आलेल्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी रिक्षाशिवाय दुसरे साधन नव्हते. रस्ते पूर्णत: सुनसान झालेले दिसत होते. अशा प्रसंगी अनेक रिक्षाचालकांनीही रिक्षा बंद ठेवल्या होत्या, तर काही रिक्षाचालकांकडून जास्तीचे भाडे वसूल केले गेले. कारवाईच्या भीतीनेदेखील एका रिक्षात फक्त दोनच प्रवासी घेऊन रिक्षाचालक फिरताना आढळून आले. दरम्यान, रविवारी रेल्वेची परीक्षा नियोजित होती. त्यामुळे, या परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. मात्र, रस्त्यांवर वाहने नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड झाल्याचं दिसून आलं.
औरंगाबादमध्ये लॉकडाऊन सुरू असताना रेल्वे बोर्डाची परीक्षा द्यायला जाणाऱ्या विद्यार्थीनीला वाहन मिळत नसल्याने ती गोंधळली होती. मात्र, पो.अं. हनुमंत चाळनेवाड यांनी तिला स्वतः परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचविले. त्यामुळे, विद्यार्थीनीचा जीव भांड्यात पडला. पोलीस अंमलदार चाळनेवाड यांच्या या कामगिरीमुळे पोलीस आयुक्त यांनी त्यांना ५००० रुपयांचे बक्षीस देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. औरंगाबाद सीपीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.