केशव बळीराम ढगे (रा. रांजणगाव) यास बुधवार (दि. ६) शहरातून औषधी आणायची असल्याने त्याने आपला मित्र अमोल निकाळजे (रा. वडगाव) याची दुचाकी मागवून घेतली होती. अमोल याने दुचाकी (एमएम २० एफएस ५१४५) दिल्यानंतर केशव हा औषधी आणण्यासाठी शहरात गेला होता. शहरातून घरी परत येत असताना ए. एस. क्लबजवळ रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट परिधान केलेल्या एका अनोळखी इसमाने दुचाकीस्वार केशव ढगे याला रस्त्यात अडविले. त्या अनोळखी इसमाने केशव यास मी वाहतूक पोलीस असून, तुला सिग्नल दिसत नाही का, तू सिग्नल तोडला आहे, असे म्हणून दुचाकीची चावी काढून घेतली. यानंतर केशव यास त्या अनोळखी इसमाने दुचाकी रस्त्याच्या बाजुला लावण्यास सांगत त्याच्या जवळील मोबाईल व पाकीट काढून घेत आपल्या साथीदाराकडे दिला. काही वेळात त्या अनोळखी इसमाने केशवकडे प्लास्टिकची काठी देऊन मी माझ्या मित्राला सोडून येतो, असे म्हणून दुचाकी, मोबाईल व पाकीट घेऊन साथीदारासह निघून गेला. बराच वेळ वाट पाहिली. मात्र, तो अनोळखी इसम दुचाकी घेऊन परत न आल्याने केशव ढगे हा घरी निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच केशव ढगे याने सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी तोतया पोलीस व त्याच्या साथीदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोना. जाधव हे करीत आहेत.
---------------------------
चोरट्याने दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : ए. हस. क्लब परिसरातील गुरु साई रेसिडेन्सी परिसरातून दुचाकी लांबविणाऱ्या अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल काळू आढागळे यांनी बुधवार (दि. ६) सायंकाळी सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकी (एमएच १५ एचडी ०३७९ उभी केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
---------------------------
मसिआतर्फे आज विविध कार्यक्रम
वाळूज महानगर : मसिआ संघटनेच्या उद्या मंगळवार (दि. १२) वाळूजच्या मसिआच्या सभागृहात रक्तदान शिबिरासह तणाव व्यवस्थापनासाठी पोषक व पौष्टिक आहार या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी १० वाजता अतिरिक्त उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले जाणार आहे. यानंतर दुपारी २ वाजता मसिआ व रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने तणाव व्यवस्थापनासाठी पोषक व पौष्टिक आहार या विषयावर डॉ. संगीता देशपांडे या मार्गदर्शन करणार आहेत.
---------------------