मराठा क्रांती मोर्चाच्या आप्पा कुढेकर, रमेश केरे पाटील, पंढरीनाथ गोडसे, भारत कदम आणि निवृत्ती मांडकीकर, दिव्या मराठे यांना सिडको पोलिसांनी अटक केली, तर काहींना पैठण आणि बिडकीन पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. हर्सूल पोलिसांनी मनोज गायके यांना रात्री त्यांच्या घरातून उचलून रात्रभर ठाण्यात बसवून ठेवले. आंदोलन करण्यासाठी हॉटेल रामगिरीसमोर आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या गणेश उगले आणि नजीरोद्दीन फारूकी यांना पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. मात्र, आणखी काही लोक अचानक रस्त्यावर आल्यास आंदोलन चिघळू शकते, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी घेतली होती. नवनिर्माण सेनेने पाणी प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनाही ताब्यात घेण्यासाठी पोलीस गुरुवारी रात्रीपासून त्यांचा शोध घेत होते; परंतु सर्व पदाधिकाऱ्यांनी मोबाईल बंद करून ठेवले होते. शिवाय ते कुठे आहेत याविषयी माहितीही पोलिसांना मिळत नव्हती. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी पत्रकारांना संपर्क करूनही उपयोग न झाल्याने पोलिसांची झोप उडाली. विशेष शाखेचे आणि पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रभर त्यांचा शोध घेत होते. त्यांना शोधा, ताब्यात घ्या, असे फर्मान वरिष्ठांचे होते.
आंदोलकांनी उडवली पोलिसांची झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:05 AM