औरंगाबाद : मृत अर्भकाला जन्म दिल्यानंतर मातेने घाटीतून पळ काढला. ही माहिती मिळाल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्या मातेला शोधून काढले आणि उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहतिच्या ताब्यात दिला.
पतीसोबत पटत नसल्यामुळे राजनगरातील (मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसर) ३० वर्षीय महिला तीन महिन्यांपासून घर सोडून निघून गेली. त्यावेळी ती सहा महिन्यांची गर्भवती होती. दोन दिवसांपूर्वी ती एकटीच प्रसूतीसाठी घाटीत दाखल झाली. काल मंगळवारी तिने मृत बाळाला जन्म दिला. बाळ मृत असल्याचे समजताच काही तासांनंतर ती घाटीतून गायब झाली. या बाळाचे शवविच्छेदन करून अंत्यविधी करणे आवश्यक असल्याने या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली.
घाटी चौकीतून मुकुंदवाडी ठाण्याला एमएलसी गेल्यानंतर पो.हे.कॉ. एस.ए. मनगटे आणि कर्मचाºयांनी पोलीस निरीक्षक यू.जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेचा शोध सुरू केला. महिलेने दिलेला पत्त्यावर ती राहत नसल्याचे समजले. मात्र, तीन महिन्यांपूर्वी तिने पतीविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक होता. पोलिसांनी तिच्या पतीला शोधून काढले तेव्हा त्याने तीन महिन्यांपासून त्याची पत्नी कोठे आहे, हे त्याला माहीत नसल्याचे सांगितले. त्याने सासुरवाडीच्या लोकांची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्या माहेरामध्ये गाठले. नातेवाईकांसह ती घाटीत आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.