बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप आणि अन्य अधिकारी, कर्मचारी सोमवारी दुपारी जामा मशीदजवळ नाकाबंदी करीत होते. बाहेरील त्याचवेळी परजिल्ह्याचा आरटीओ नोंदणी क्रमांक असलेली काळ्या रंगाची जीप त्यांना दिसली. यामुळे त्यांनी चालकाला हात दाखवून जीप थांबविण्याचा इशारा केला. यावेळी चालकाने त्यांना हूल देऊन पुढे सुसाट वेगाने कार दामटली. पोलिसांना संशय आल्याने नियंत्रण कक्षाला कॉल करून या जीपची माहिती कळविली आणि पोलीस निरीक्षक सानप यांनी सरकारी वाहनाने त्या जीपचा पाठलाग सुरू केला. पुढे अण्णाभाऊ साठे चौकातही पोलिसांना हुलकावणी देऊन जीपचालक दिल्लीगेट हिमायत बागच्या दिशेने निघाला. पोलीस नियंत्रण कक्षाने लगेच हर्सूल टी पॉईंट येथे नाकाबंदी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे यांना ही जीप रोखण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक खिल्लारे, हवालदार कायटे, महिला पोलीस वाडेकर आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बॅरिकेड लावले. शिवाय फौजदार खिल्लारे यांनी दोन रिक्षा रस्त्यात उभ्या केल्या. यावेळी संशयित जीप येताच पोलिसांनी चालकाला गाडी थांबवून जीपमधून खाली उतरायला लावले. याचवेळी निरीक्षक सानप हे तेथे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. जीपची झडती घेण्यात आली; मात्र जीपमध्ये संशयित काहीही नव्हते. पोलिसांनी जीप आणि चालकाला ताब्यात घेतले आणि ठाण्यात नेले. ही जीप समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची असल्याचे समजले.
सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी जीप पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:04 AM