औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लॉकडाऊनच्या काळात सामान्य ग्राहकांना दिलेल्या वाढीव वीज बिलांविरोधात काढलेला मोर्चा पोलिसांनी औरंगपुऱ्यातील महात्मा फुले चौकातच रोखला. मोर्चेकरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सोडले.
महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मनसेने सामान्य वीज ग्राहकांना सोबत घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मोर्चाच्या दोन दिवसांपूर्वी मनसेने मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्यावर वाढीव वीजबिले भिरकावून निषेध केला होता. त्यानंतर गुरुवारी मोर्चाचे नियोजन केले होते; परंतु २५ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस आयुक्त एच. एस. भापकर यांनी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू असून संचारबंदी सुरू आहे, ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असल्याचे कळविले होते. कलम १४९ नुसार नोटीस देऊन मोर्चाला मनाई आदेश दिला होता. आदेशाचे उल्लंघन करून मोर्चा काढल्यास पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही भापकर यांनी म्हटले होते. नोटीस देऊन मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यानंतरही मनसेने गुरुवारी महात्मा फुले चौकातून मोर्चा काढण्याची तयारी केली. सकाळी ९ वाजेपासून चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. मोर्चेकरी चौकात येताच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होता मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रासह मोर्चाचे नियोजन होते; परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने ठाकरे यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे, शहराध्यक्ष सतनाम गुलाटी, अशोक पवार, प्रशांत जोशी, संदीप कुलकर्णी, चेतन पाटील, वृषभ रगडे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले.