औरंगाबाद : राज्यात कोठेही वाहतूक नियम मोडल्यानंतर दंड न भरलेल्या वाहनाच्या चालकाला राज्यातील कोणत्याही शहरात वाहतूक नियम मोडताना दुसऱ्यांदा पकडले, तर ‘वन स्टेट, वन चालान’ या संकल्पनेनुसार त्या वाहनचालकाकडून यापूर्वीचा दंड वसूल केला जातो; अन्यथा ते वाहन जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. शहर वाहतूक पोलिसांनी ‘वन स्टेट, वन चालान’प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे. पुणे, मुंबई शहरांत वाहतूक नियम मोडून दंड न भरता औरंगाबादेत आलेल्या वाहनचालकांकडून येथे दंड वसूल केला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे म्हणाले की, सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, वाहनचालक नियम मोडून वाहने चालवीत असतात. राज्य सरकारने आता वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘वन स्टेट, वन चालान’ प्रणालीचा वापर सुरू केला. हे ई-चालान असून, वाहनचालकांना ई-चालान देऊन त्यांच्याकडून शक्य असेल, तर एटीएम कार्ड, डेबिट कार्ड स्वॅप करून आॅनलाईन दंड भरून घ्यावा, असे निर्देश दिले. १ मेपासून औरंगाबाद शहर वाहतूक पोलीस ई-चालानचा वापर करीत आहे. याकरिता शहरातील पाच वाहतूक विभागांतर्गत शंभर ई-चालान डिव्हाईस वाटप करण्यात आले आहे. हे डिव्हाईस वापरण्याचे प्रशिक्षण गत महिन्यात वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते.
१ मेपासून ९ हजार ८८८ वाहनचालकांवर कारवाईई-चालान डिव्हाईसचा वापर १ मेपासूनच सुरू झाला. तेव्हापासून कालपर्यंत ९ हजार ८८८ वाहनचालकांना वाहतूक नियम मोडताना पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना ई-चालान करून त्यांच्याकडून २४ लाख ९७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती एसीपी काकडे यांनी दिली. ते म्हणाले की, ज्या वाहनचालकांकडे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड नसेल आणि ते जागेवर दंड भरण्यास असमर्थता दर्शवीत असतील, त्या वाहनचालकांच्या गाडीच्या कागदपत्रांवर आणि ड्रायव्हिंग लायसन्सवर दंड (अनपेड) बाकी असल्याचे नमूद असते.
दुसऱ्यांदा नियम मोडल्यास वाहन होते जमाजे वाहनचालक नियम मोडल्यानंतर दंड भरत नाहीत, त्या वाहनचालकांची सर्व माहिती (डेटा) आॅनलाईन साठवून ठेवली जाते. दुसऱ्यांदा नियम मोडताना त्यांना पकडण्यात आले, तर मागील दंड वसूल करून घेतला जातो. मात्र, यावेळीही जर वाहनचालक दंड भरत नसेल, तर त्याचे वाहन जमा करून घेतले जाते.