ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद /वैजापुर : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे पंचमीला जुगार खेळण्याची जुनी परंपरा आहे. यानुसार जिल्हा परिषदेच्या मैदानावर जुगाराचा खेळ सुरु झाला. पण पोलिसांनी यावर छापा टाकत हा जुगार बंद पाडला. नागरिकांनी मात्र पोलिसांच्या या विघ्नानंतरहि जागा बदलत पत्तेपंचमी साजरी करण्यावर भर दिला.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नाग पंचमीला जुगार खेळण्याची कुप्रथा काही अंशी मोडीत निघाली आहे. यावेळी जुगा-यांनी पळ काढला असला तरी पोलिसांनी मैदानावरील त्यांच्या गाड्या ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात लावल्या आहेत. मात्र, हा खेळ म्हणजे जुगार नव्हे हि एक परंपरा आहे अशी नागरिकांची भावना आहे.
पत्ते पंचमीची परंपरा खंडाळा येथे पंचमीत खेळल्या जाणाऱ्या जुगार या खेळाला खूप जुनी परंपरा आहे. हा खेळ म्हणजे जुगार नव्हे. पंचमीच्या आनंदात भर घालणारा तो मनोरंजनाचा एक प्रकार आहे, हे पटवून देत ही परंपरा कायम ठेवण्यासाठी येथे सर्व समाजातील जाणते लोकं प्रयत्न करताना दिसतात. जुगा-यांना पर्वणी ठरलेल्या पंचमीला पत्त्यांचे मोठे डाव येथे भरवण्यात येतात.यात झन्ना-मन्ना, एक्का-बादशाह, तिर्रट असे पत्त्यांचे खेळामध्ये पैसे लावून हजारो रुपयांचा जुगार खेळला जातो. पहाटे पासूनच रंगलेल्या या खेळात तरुणांचा अधिक भरणा होता.
कुप्रथा हद्दपार करण्यासाठी पोलिसांची कारवाई
ग्रामीण भागात पत्त्यांच्या खेळाची कुप्रथा रूढ झाली असून,ही प्रथा घातक आहे. या प्रथेला हद्दपार करण्यासाठी यंदा पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या आदेशा नुसार जिल्यातील सर्व पोलिस ठाण्याला कड़क सुचना देवून जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.