वाळूज महानगर : दोन लाख रुपये लुटल्याचा शोध लावण्याऐवजी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी उलट फिर्यादी ट्रान्सपोर्ट चालकांचाच छळ सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेला उलटून आठवडा झाला तरी फिर्यादीला एफआयआरची प्रतसुद्धा देण्यात आली नाही. त्यामुळे त्रस्त ट्रान्सपोर्ट चालकांनी थेट पोलीस आयुक्तांकडे आपले गाऱ्हाणे मांडले.वाळूज येथील ट्रान्सपोर्टचालक सोपान मुरलीधर कदम यांनी २४ जुलै रोजी पंढरपुरातील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेतून १ लाख ९० हजार ८०५ रुपये काढले. त्यांनी ही रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून म्हाडा कॉलनीतील आपल्या घराकडे निघाले. दुचाकी पंक्चर झाल्यामुळे कदम हे अब्बास पेट्रोलपंपालगत पंक्चर काढण्यासाठी थांबले. तेथे अचानक एका युवकास फिटस् आल्याने कदम मदतीसाठी धावले. कदम परत येईपर्यंत डिक्कीतील रक्कम गायब झाली होती. कदम यांनी आरडाओरडा करून फिटस् आल्याचे नाटक करणारा युवक व त्याच्या साथीदारास पाठलाग करून पकडले. नंतर त्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी शिवाजी रवी भोई, संतोष रवी भोई यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच-१५, झेड-४६३) व वाहने पंक्चर करण्याचे साहित्य मिळून आले होते. आरोपींनी लूटमार केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध लावण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले नाही. २ लाख रुपये लुटल्याच्या घटनेला १० दिवसांचा कालावधी झाला तरी एफआयआरची प्रतही एमआयडीसी वाळूज पोलिसांनी फिर्यादीला दिली नसल्याचा आरोप कदम यांनी केला. आर्थिक परिस्थिती बिकट असून, कर्जदारांना देण्यासाठी काढलेली रक्कम चोरट्यानी लांबविल्यामुळे मी हतबल झालो असून, देणी कशी फेडावी असा प्रश्न पडल्याचे त्यांनी नमूद केले. पोलीस या प्रकरणात टोलवाटोलवी करीत असल्यामुळे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. फौजदार अजयकुमार पांडे म्हणाले की, दोन्ही आरोपी सराईत असून, कोठडीत त्यांनी साथीदाराविषयी कुठलीही माहिती दिली नाही. कोठडीची मुदत संपल्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यात दोघांना ३० जुलै रोजी जिन्सी पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.नागरिकांमध्ये असंतोष वाढतोय वाळूज औद्योगिक परिसरात गंभीर गुन्हे घडत असल्यामुळे व्यावसायिक, उद्योजक व नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. मागील महिन्यात पंढरपुरातील उद्योग आयकॉन कॉम्प्लेक्समध्ये दरोडेखोरांनी एकाच रात्री सहा दुकाने फोडली होती. याचा तपास अजून अपूर्ण आहे. पंढरपुरातील गजबजलेल्या भाजीमंडईत निसार शेख या युवकावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. गोळीबार करणाऱ्या आरोपींचे रेखाचित्र प्रसिद्ध करून तसेच माहिती देणाऱ्यास रोख स्वरूपाचे बक्षीस जाहीर करूनही हे आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर ट्रान्सपोर्टचालकाचे ४० हजार तसेच टीसीआय कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्या एटीएममधून २० हजार रुपये लुटले. अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास न लागल्याने पोलीस प्रशासनाविषयी असंतोष धुमसत आहे.
पोलिसांकडून फिर्यादीचा छळ
By admin | Published: August 03, 2014 12:51 AM