मंठा : शहरातील तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निवारण करण्यासाठी गत एक वर्षापासून मंठा ते पांगरीखुर्द एक्स्प्रेस फिटरचे रखडलेले काम अखेर पोलिस बंदोबस्तात करण्यात आल्याने मंठेकरांना खरेच पाणी मिळणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.मंठा शहराला पांगरी खुर्द येथील तलावाजवळून पाणी पुरवठा सध्या सुरू आहे. त्यामध्ये सदरील विहीर ग्रामीण भागात येत असल्याने या ठिकाणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे त्यातच भारनियमन यामुळे शहराला पाणी पुरवठा होण्यास मोठी अडचण येत होती. ती अडचण दूर करण्यासाठी गतवर्षी एक्स्प्रेस फिटरचे काम सुरू केले होेते. त्यात अनेक अडचणी निर्माण झाल्यानंतर नानसी पूनर्वसन गावातून एक्स्प्रेस फिटरलाईन नेण्यास काही नागरिकांनी विरोध दर्शविला होता. परंतु कोणत्याही परिस्थितीत हे काम झालेच पाहिजे, असा पवित्रा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेऊन सदरील काम पोलिस बंदोबस्तात करून घेतल्याने आता पांगरी तलावात शेजारील विहिरीवर २४ तास वीजपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे शहराला आता काही भागात का होईना, पाणी मिळेल, अशी आशा आहे.मंठा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पांगरी खुर्दहून ज्येष्ठ नेते गोपाळराव बोराडे यांच्या पुढाकाराने तात्पुरती पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात आली होती. तर आता मात्र निम्न दुधना प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी गतवर्षी मंजूर करून या कामाचे भूमिपूजन केले असता मध्यंतरी या योजनेचे काम बंद पडले होते. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी विशेष लक्ष घालून या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केल्याने कायमस्वरूपी पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे तर पांगरी खुर्द येथूनही लोणीकरांमुळे मुबलक पाणी मिळणार असल्याचे नागरिक सांगत आहेत. (वार्ताहर)
पोलीस बंदोबस्तात मंठेकरांना मिळणार पाणी ?
By admin | Published: August 20, 2015 12:25 AM