औरंगाबाद : मुकुंदवाडी येथील एस.टी. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी पुरवठादाराशी संगनमत करून पॉलिश खरेदीत घोटाळा केल्याची धक्कादायक बाब समोर आली. महामंडळाच्या दक्षता अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करीत पुरवठादारासह, वर्कशॉपचे वरिष्ठ लिपिक, सहायक भांडार अधिकारी, वरिष्ठ भांडार अधिकारी यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
स्थानिक खरेदी वरिष्ठ लिपिक शशिकांत सुरेश पाटील, सहायक भांडार अधिकारी सुभाष रामकृष्ण कोटे, वरिष्ठ भांडार अधिकारी राजेंद्र केशव फडणवीस, मे. कलर होमचे मालक तथा प्रवीण जैस्वाल अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याविषयी पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रवीण जैस्वाल यांनी मुकुंदवाडीतील एस.टी.महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेला पॉलिश बॉटलचा पुरवठा करण्याचे काम मिळाले होते.
करारानुसार त्याने ३ एम प्रतिनग ९४० मिलीप्रमाणे ९९९ रुपये दराने पुरवठा करण्याचे त्यास आदेशित केले होते. जैस्वालने मात्र ९९९ रुपये किमतीच्या ९४० मिलीची बॉटल पॉलिशचा पुरवठा करण्याऐवजी १४० रुपये किमतीचे ३ एमचे १०० मिलीच्या दोन बॉटलचा पुरवठा भांडार विभागाला केला.
त्यानंतर आरोपीने भांडार लिपिक, सहायक भांडार अधिकारी आणि वरिष्ठ भांडार अधिकारी यांच्याशी संगनमत करून कार्यशाळेला प्रतिनग ९९९ रुपयांप्रमाणे ५७ हजार ४१९ रुपयांचे बिल सादर करून ते वसूल केले. ही बाब महामंडळाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी विनोद खंदारे यांना समजली. त्यानंतर खंदारे यांनी कार्यशाळेत जाऊन भांडार विभागातील ३ एमचे १०० मिली दोन पॉलिश बॉटल सॅम्पल म्हणून जप्त करून पंचनामा केला. त्यानंतर या घोटाळ्याची माहिती मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी यांना कळविली.
त्यांच्या आदेशाने खंदारे यांनी याप्रकरणी झालेल्या खरेदी व्यवहारासंबंधी आणि भांडार विभागातील रजिस्टर जप्त करून त्याची तपासणी केली असता खरेदी रजिस्टरमध्ये अनेक ठिकाणी खाडाखोड करण्यात आल्याचे दिसून आले आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले. दरम्यान, खंदारे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने ४ एप्रिल रोजी एमआयडीसी सिडको ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आला आहे.