बीड : राज्यातील राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्यातीलही समीकरणे बदलली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे आष्टीचे आ. सुरेश धस आणि गेवराईचे लक्ष्मण पवार यांच्या नावाची चर्चा होती. परंतु अचानक राष्ट्रवादीने सरकारसोबत युती केल्याने आणि त्यातच बीड जिल्ह्याला धनंजय मुंडे यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाल्याने पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप आमदारांच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या छत्रपती संभाजीनगर येथील अतुल सावे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतरच हे सर्व बदल होणार, हे देखील तितकेच खरे.
२०१९ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्रित लढविली. परंतु नंतर सत्ता स्थापन करताना भाजपला बाजूला करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सरकार बनविले. अडीच वर्षे हे सरकार राहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडून पुन्हा भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांचे सरकार आले. या सरकारला वर्ष पूर्ण होताच राष्ट्रवादीतील मोठा गट घेऊन अजित पवारही भाजप-शिवसेना युतीत सहभागी झाले. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि त्यांच्या इतर ९ सहकाऱ्यांना कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले. यात बीडमधील परळी मतदारसंघाचे आ. धनंजय मुंडे यांचा समावेश होता. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर बीडला मंत्रिपदापासून बाजूला ठेवण्यात आले होते. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे आ. सुरेश धस आणि लक्ष्मण पवार यांच्या नावाची जोरात चर्चा होती. त्यांच्यासोबत नमिता मुंदडाही होत्या. परंतु राज्यातील समिकरणे बदलल्याने मुंडे मंत्री झाले. त्यांच्या रूपानेच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्याने दुसरे पद येईल का? याबाबत शंका आहे. परंतु मुंडे हेच आता दुसऱ्यांदा पालकमंत्री होणार असल्याचे सांगण्यात येत असून आ. धस व आ. पवार यांचे मंत्री होण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
राज्यमंत्रिपदासाठी यांची नावे चर्चेतकॅबिनेटमध्ये संधी मिळाली नाही तरी राज्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके, भाजपचे आ. धस, आ. पवार, आ. मुंदडा यांच्या नावाची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
पंकजा मुंडे, ज्योती मेटे, पंडित यांच्यापैकी कोण आमदार?विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा भरण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोकळा झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे, शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे आणि राष्ट्रवादीचे माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. यामध्ये कोणाचा नंबर लागतो, याकडेही लक्ष लागले आहे.
जयदत्त क्षीरसागरांची भूमिका अस्पष्टराज्यात एवढे राजकीय भूकंप झाले तरी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अजूनही शांत आहेत. सध्या ते कोणत्याच पक्षात नाहीत. मध्यंतरी ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता अजित पवार गटात जाण्याची चर्चा होत आहे; परंतु क्षीरसागरांनी अद्यापही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी मंत्रिपद मिळविले होते, आता कोणत्या तरी एका पक्षात सहभागी होऊन विधान परिषदेची आमदारकी मिळविण्याची किमया ते करणार का? याकडेही लक्ष लागले आहे.