संतोष हिरेमठ
औरंगाबाद : राजकीय अनास्थेचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील रेल्वे विकासाला बसत आहे. वर्षानुवर्षे रेल्वे प्रकल्प कागदावरच आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात तब्बल ८९३ कि. मी.चा रेल्वे मार्ग आहे; परंतु यात केवळ ८१.८५० कि.मी. मार्गाचे दुहेरीकरण झाले आहे, तर फक्त ३७ कि.मी. विद्युतीकरण झाले आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती पुढे आली असून, मराठवाड्यातील खासदारांनी आतातरी जागे व्हावे, अशी अपेक्षा रेल्वे संघटनांकडून व्यक्त होत आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून मनमाड-औरंगाबाद-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु वर्षानुवर्षे हा प्रस्ताव कागदावरच आहे. दुहेरीकरणाचा हा प्रस्तावही थंडबस्त्यात गेला आहे. या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेले असताना सध्या तरी त्याला रेल्वे बोर्डाकडून प्राधान्य नसल्याचेही माहिती अधिकारातून पुढे आले आहे. मनमाड-परभणी हा २९१ कि.मी.चा मार्ग आहे. यासाठी तीन वर्षांपूर्वी २ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही प्रस्तावाला मंजुरीच मिळालेली नाही. त्यामुळे हा खर्चही वाढल्याची शक्यता आहे. एकेरी रुळावरून क्षमतेपेक्षा अधिक रेल्वे धावतात. त्याची रेल्वे प्रशासनाला कल्पना आहे. एकेरी मार्गावर इंजिन नादुरुस्त झाले तर संपूर्ण वाहतूकच विस्कळीत होते, तरीही दुहेरीकरणाचा प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची स्थिती आहे. राजकीय पाठपुरावा कमी पडत असल्याची ही परिस्थिती ओढावत असल्याची ओरड होत आहे.
------
खासदारांनी जागे व्हावे
माहिती अधिकारात दुहेरीकरण, विद्युतीकरणाची माहिती मागितली होती. तेव्हा नांदेड विभागात ८९३ कि.मी. पैकी केवळ ८१ कि.मी. मार्गाचे दुहेरीकरण आणि ३७ कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण झाल्याची माहिती मिळाली. दक्षिण मध्य रेल्वेच्या अन्य विभागांत पूर्ण विद्युतीकरण, दुहेरीकरण झाले आहे. मराठवाड्यावरच अन्याय होत आहे. मराठवाड्यातील खासदारांनी आता तरी जागे झाले पाहिजे.
- गौतम नाहाटा, अध्यक्ष, नमो रेल्वे संघटना
-----
पुढील अर्थसंकल्पात दुहेरीकरण
मनमाड-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुढील म्हणजे २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात घेतले जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. विद्युतीकरणाला मंजुरी मिळाली आहे. निविदाही पूर्ण झाली आहे. रेल्वेमंत्र्यांची वेळ घेऊन लवकरच विद्युतीकरणाचे भूमिपूजन केले जाईल.
- खा. डाॅ. भागवत कराड