औरंगाबाद : गुलमंडीवर सोमवारी सायंकाळी शिवसेना-भाजपच्या राजकीय मंडळींनी महापालिकेच्या नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्याला ‘गुलमंडीवर येऊच नका’ म्हणत बेदम मारहाण केली. मंगळवारी सकाळीच महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक आणि नगररचना विभागातील कर्मचारी ‘आम्ही आलो’ म्हणत दाखल झाले. त्यांनी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील सर्व ओटे जमीनदोस्त करून शहरात कायद्याचे राज्य आहे, हे दाखवून दिले.
त्याचे झाले असे की, महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून सोमवारी सायंकाळी गुलमंडीवर मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरू होती. त्यात दोन विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. ते पथकासमोर गयावया करीत रडत होते. तेथे उपस्थित माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांचा माणुसकीचा झरा फुटला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यास ‘गुलमंडीवर येऊ नका’ म्हणून बेदम मारहाण केली. घटनेनंतर सेनेचे माजी आ. किशनचंद तनवाणीही तेथे आले. रात्री उशिरा क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
महापालिका प्रशासनाने सकाळीच गुलमंडीवर अतिक्रमण हटाव पथक, नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी कारवाईसाठी पाठवून दिले. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्किंगनुसार बाराभाई ताजिया ते कुंभारवाडा कॉर्नरपर्यंत व्यापाऱ्यांचे सर्व ओटे जेसीबीने जमीनदोस्त केले. कुंभारवाडा ते औरंगपुरा पोलीस चौकीपर्यंत लहान मोठी अतिक्रमणे पाडण्यात आली. सायंकाळपर्यंत ५० पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. लोखंडी शेड, पत्रे, ओटे मोठ्या संख्येने काढण्यात आले. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सहाय्यक जमशीद, मजहर अली, पी. बी. गवळी यांनी केली.
मारामारी अनैतिक, अशोभनीय, अवैधानिकमहाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. माजी सैनिकांच्या विरोधात तक्रार असेल तर ती रीतसर प्रशासनाकडे मांडली पाहिजे. प्रशासन चौकशी करून दोषींवर कारवाई करील. माजी सैनिकांनी नम्रपणे नागरिकांना वागणूक दिली पाहिजे, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. गुलमंडीवर नेमकी काय कारवाई सुरू आहे, याबाबत कल्पना नाही.- आस्तिक कुमार पाण्डेय, प्रशासक मनपा
प्रशासनाने सूडबुद्धीने काम करू नयेगुलमंडीवर मंगळवारी सकाळपासून व्यापाऱ्यांचे ओटे तोडण्यात येत आहेत. सूडबुद्धीने प्रशासन वागत आहे. कारण नसताना ओटे कशासाठी तोडण्यात आले. शहरात सर्वत्र अतिक्रमणे आहेत. सगळीकडेच महापालिकेने कारवाई करावी. एकट्या गुलमंडीची निवड कशासाठी करण्यात आली? आता ओटे तोडले तर रोडचे काम कधी करणार? या भागातील रस्ते रुंद करून घ्यावेत यासाठी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे. त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.- किशनचंद तनवाणी, माजी आमदार.