औरंगाबाद : कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गाबाई भागवत होत्या. यशवंतराव चव्हाणही संमेलनाला उपस्थित होते; पण त्यांचे राजकीय वलय बाजूला ठेवून ते रसिक म्हणून समोरच्या रांगेत बसले आणि साहित्य संमेलनात साहित्यिकांचा मान असतो, असे सर्वांसमक्ष सांगितले. हा आदर्श समोर ठेवून उस्मानाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनातही राजकीय नेत्यांनी ‘रसिक’ म्हणून यावे, असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे आदर्श कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केले.
कथा, कविता, परिसंवादाने खुलणार साहित्य संमेलन
ठाले पाटील यांनी संमेलन पूर्णपणे अराजकीय आणि राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपाशिवाय होणार असल्याचे नमूद केले. यासाठी त्यांनी कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेचा दाखला दिला आणि या संमेलनातही भूमिकेनुसारच राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येणार असल्याचे नमूद केले. यंदाचे साहित्य संमेलन राजकीय पाठिंब्याशिवाय आणि पूर्णपणे लोकसहभागातूनच घ्यायचे, असे निश्चित केले होते. त्यानुसारच संमेलनाच्या कार्यक्रमांची आखणी झाली असल्याचे सांगत ठाले पाटील म्हणाले. साहित्य संमेलनासाठी आम्ही सर्व राजकीय नेत्यांना पत्रिका दिली असून, त्यांना ‘रसिक’ म्हणून आमंत्रित केले आहे, तर राजकीय हस्तक्षेप नसल्यामुळे यंदाचे साहित्य संमेलन निर्विवाद पार पडेल, अशी अपेक्षा मसापचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी व्यक्त केली.