विकास राऊत, औरंगाबादशिवसेना, भाजपाचा घटस्फोट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा काडीमोड झाल्याने व एमआयएम या पक्षाचा शहरात शिरकाव झाल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेच्या राजकारणाचा प्लॅटफार्म म्हणून पालिकेकडे पाहिले जाते. मनपाच्या माध्यमातूनच अनेकांची राजकीय कारकीर्द घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे सर्व राजकारण्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे.सत्ताधारी शिवसेना, भाजपा युती तुटल्यामुळे त्यांचा २०१५ मध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीत कस लागणार आहे, तर एमआयएममुळे काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेसची मुस्लिम, दलित मतांची बँक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. त्यांना नवीन मतदारांना स्वत:कडे वळवावे लागणार आहे, तर हिंदू मतांचे धु्रवीकरण झाल्यामुळे शिवसेनेला पूर्व आणि मध्य मतदारसंघात पराभव पत्करावा लागला आहे. भाजपाने पूर्व मतदारसंघात निसटता विजय मिळविला; परंतु मध्यमध्ये हिंदू मतांचे विभाजन दोन्ही पक्षांसाठी घातक ठरले. भाजपाला सर्वाधिक मते...शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघांत भाजपाला १ लाख ५९ हजार ३८३ मते मिळाली. एमआयएमच्या तिन्ही उमेदवारांनी पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघात १ लाख ५७ हजार ४५९ मते घेतली. शिवसेनेला १ लाख १४ हजार ५५२ तर काँग्रेसला ४५ हजार ९४ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला १९ हजार १६१ मते मिळाली तर मनसेच्या तिन्ही उमेदवारांना फक्त ९ हजार ६४० मते मिळाली आहेत. फुलंब्रीतील ६ वॉर्ड आणि शहरातील ९३ वॉर्ड मिळून साडेआठ लाख मतदार शहरात आहेत. त्यापैकी ५ लाख ४९ हजार ९६७ मतदारांनी मतदान केले. सुमारे २० टक्के मते एमआयएमने घेतली आहेत. ही व्होटबँक परंपरेनुसार काँग्रेस, राष्ट्रवादीची होती. आता ती व्होटबँक एमआयएमकडे गेल्यामुळे मनपातील आघाडीकडे असलेले ३० नगरसेवकांचे संख्याबळ घटणार असल्याचे दिसते. तर भाजपाकडे असलेले १५ नगरसेवकांचे संख्याबळ वाढविण्यासाठी पूर्व मतदारसंघातील शिवसेनेला खिंडार पाडण्याची रणनीती ठरविण्यासाठी भाजपाने सुरुवात केली आहे. शिवसेनेला आहे ते ३० संख्याबळ टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.
मनपात राजकीय गणित बदलणार
By admin | Published: October 22, 2014 12:45 AM