लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोणत्याही राजकीय पक्षाने उठावे व राज्य, देशव्यापी बंदची घोषणा करावी आणि व्यापाºयांनी भीतिपोटी आपली दुकाने बंद करावीत, हे दृश्य आता कालबाह्य होणार आहे. कारण, यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाला, संघटनांना बाजारपेठ बंदचा निर्णय घ्यायचा असल्यास पहिले जिल्हा व्यापारी महासंघाची परवानगी घ्यावी लागणार आहे. देशहितासाठी बंद असेल तर महासंघ विचार करील नसता बाजारपेठ बंद राहणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय मंगळवारी मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अॅण्ड कॉमर्सने घेतला आहे.या निर्णयामुळे आता व्यापाºयांच्या जीवावर राजकीय पक्षांना व इतर संघटनांना आपली राजकीय पोळी भाजता येणार नाही. वेगवेगळ्या घटनांमुळे मागील पाच महिन्यांपासून औरंगाबाद शहरात अनेकदा दंगल झाली. त्यात राजकीय पक्षांचे बाजारपेठ बंदचे आवाहन, यामुळे येथील व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक विकासाच्या दृष्टिकोनातून पाच वर्षे शहर मागे गेले आहे. कोणीही उठावे व दुकाने बंद करावीत, यामुळे व्यापाºयांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली. जिल्हा व्यापारी महासंघाने याची गंभीर दखल घेतली. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता बाजारपेठ बंदची घोषणा केली, तर व्यापारी त्यात सहभागी होणार नाहीत, असा निर्णयघेतला.या निर्णयाची व्यापकता वाढवत आज मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अॅण्ड कॉमर्सने संपूर्ण मराठवाड्यासाठी हा नियम लागू केला आहे. यासंदर्भात अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी सांगितले की, लोकशाहीत बंदची हाक देणे प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे; मात्र यापुढे बाजारपेठ बंद पुकारण्यापूर्वी त्या राजकीय पक्षाला मराठवाडा चेंबर किंवा त्या जिल्ह्यातील जिल्हा व्यापारी महासंघापुढे आपली भूमिका मांडावी लागणार आहे. जर देशहितासाठी बंद असेल, तर व्यापाºयांना बंदचे आवाहन केले जाईल. जर राजकीय हेतूने प्रेरित बंद असेल, तर व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार नाहीत.यासंदर्भातील ठराव बैठकीत एकमताने पास करण्यात आला. यावेळी संघटनेचे मराठवाड्यातील सर्व प्रतिनिधी हजर होते. यात सहसचिव राकेश सोनी, मन्मयअप्पा हेरकर, विकास साहुजी, चंपालाल लोढा, हरिप्रसाद सोमाणी, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, मराठवाडा चेंबरचे माजी अध्यक्ष तनसुख झांबड, तसेच अजय शहा, सरदार हरिसिंग, विजय जैस्वाल आदींची उपस्थिती होती.
राजकीय हेतूने प्रेरित बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:11 AM
कोणत्याही राजकीय पक्षाने उठावे व राज्य, देशव्यापी बंदची घोषणा करावी आणि व्यापाºयांनी भीतिपोटी आपली दुकाने बंद करावीत, हे दृश्य आता कालबाह्य होणार आहे.
ठळक मुद्देऐतिहासिक निर्णय : मराठवाडा चेंबरच्या बैठकीत ठराव संमत