लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव १९७८ मध्ये विधिमंडळाने मंजूर केला होता. मात्र, राजकारण्यांमुळे हा नामविस्तार तब्बल १६ वर्षे लांबला असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २४ व्या नामविस्तार दिनानिमित्त मंगल खिंवसरा यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. ‘नामांतर लढा ते नामविस्तार दिन’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. नामांतर लढ्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा आढावा त्यांनी घेतला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते. मंचावर विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास संचालक डॉ. नंदकुमार राठी आणि डॉ. संजय मून उपस्थित होते. मंगल खिंवसरा म्हणाल्या की, नामांतर लढा हा सामाजिक अभिसरणाचा भाग म्हणून लढला गेला. या लढ्यामध्ये सर्वच मागासवर्गीयांबरोबर सवर्ण समाजाचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. महिलांनीही या लढ्यात अग्रभागी राहून भूमिका निभावली असल्याचेही खिंवसरा यांनी सांगितले. आज आपण सर्व जण सुस्थितीत पोहोचलो आहोत. सर्वांकडे कायमस्वरूपी घर, गाड्या, पैसा आला आहे. हे सर्व बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे आणि घटनेनुसार मिळालेल्या अधिकारामुळे घडले आहे. मात्र, असे असतानाही आज लाखो आदिवासी, भटके अशा असंख्य लोकांपर्यंत स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही प्रकाश पोहोचलेला नाही. हा प्रकश पोहोचविण्यासाठी, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मंगल खिंवसरा यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय मून यांनी केले.वर्षभरात ५२ खंडांचे प्रकाशन : कुलगुरूविद्यापीठाचा नामविस्तार रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात विद्यापीठातील ५१ विभागांचे स्वतंत्र ५२ खंड प्रकाशित करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात केली. या खंडांमध्ये विद्यापीठाच्या २५ वर्षांचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. तसेच नामांतर लढ्यात सहभागी महिलांवरही एक ग्रंथ प्रकाशित केला जाईल, असेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.
राजकारण्यांमुळे नामांतर लांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:32 PM
मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव १९७८ मध्ये विधिमंडळाने मंजूर केला होता. मात्र, राजकारण्यांमुळे हा नामविस्तार तब्बल १६ वर्षे लांबला असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी केला.
ठळक मुद्देमंगल खिंवसरा : विद्यापीठात नामविस्तार दिनानिमित्त विशेष व्याख्यान