विकास राऊत
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा राजकीय धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. ८६५ पैकी ६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान आणि १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडी राजकीय जुगाड करण्याच्या तयारीत आहे. खुलेआम नाही, मात्र अंतर्गत समीकरण, कार्यकर्त्यांची भावना आणि भाजपला रोखण्यासाठी या निवडणुकीत फॉर्म्युला ठरविण्यात येणार आहे.
महाविकास आघाडी करण्याबाबत सार्वजनिक पातळीवर तशी काही चर्चा नाही; परंतु आघाडी झाली तर जास्तीच्या ग्रामपंचायती ताब्यात येतील. आघाडी नाही झाली तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील. बऱ्याचदा ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर जुगाड करूनच लढल्या जातात. त्याला राजकीय स्वरूप येत नसते. तरी सुद्धा भाजपला रोखण्यासाठी जिल्ह्यात अंतर्गत राजकीय समीकरणांचा विचार सुरू आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे भांडण आहे, कुठे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद आहे, तर कुठे काँग्रेस आणि शिवसेनेचे जमते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाही. वैयक्तिक संबंधांवरच या निवडणुका असल्या तरी महाविकास आघाडी स्थानिक पातळीवरील राजकीय ताकदीचा विचार करून सपोर्ट करणार असल्याची चर्चा आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींचा आकडा
औरंगाबाद ११४
पैठण १०८
फुलंब्री ७१
वैजापूर १३५
गंगापूर १११
कन्नड १३८
खुलताबाद ३९
सिल्लोड १०२
सोयगाव ४६
--------------------
मतदान १५ जानेवारी
मतमोजणी १८ जानेवारी
कार्यकर्त्यांची भावना आघाडी करण्याची
कार्यकर्त्यांची भावना महाविकास आघाडी करण्याची आहे. भाजपला दूर ठेवण्याबाबत ते विचार करीत आहेत. वरिष्ठ पातळीवरून तशा काही सूचना नाहीत. ही निवडणूक राजकीय पक्ष चिन्हावर नसते. पक्षाच्या ताकदीवरच पॅनल तयार करून निवडणुका लढल्या जातात. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, ते समजून निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले.
गावातील राजकीय स्थितीनुसार निर्णय
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्याबाबत काही निर्णय नाही. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर काही होईल, असे वाटत नाही. गावातील राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाणे सध्या तरी शक्य नाही. गावातील राजकीय परिस्थितीनुसार तेथे निर्णय घेतले जातील, असे शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला ठरला नाही
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अद्याप महाविकास आघाडीचा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. त्यानुसार आघाडी करून पॅनल तयार करणे आवाक्याबाहेर असल्यामुळे महाविकास आघाडी करून निवडणूक लढण्याबाबत बुधवारी मुंबईत विश्लेषणात्मक बैठक झाली. यावर एक-दोन दिवसांत निर्णय होईल, असे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले.
स्थानिक संस्थांवर भाजपचा दबदबा
जिल्ह्यात वैजापूर, सोयगाव, गंगापूर, पैठण या नगर परिषदा भाजपच्या ताब्यात आहेत. कन्नड न.प. राष्ट्रवादीकडे आहे. खुलताबाद काँग्रेसकडे आहे. सिल्लोड न.प. शिवसेनेच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. ९ पैकी पाच पंचायत समित्यांमध्ये शिवसेना वरचढ आहे.