औरंगाबाद : लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी काही दिवस बाकी असले तरी मंगळवारी शिवजयंती मुख्य मिरवणुकीच्या कार्यक्रमाला चांगलाच रंग चढला. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढत चांगलीच टोलेबाजी केली.
शिवजयंतीची मुख्य मिरवणूक राजाबाजार येथील संस्थान गणपती येथून सुरू झाली. त्यापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आ. कल्याण काळे म्हणाले की, येत्या निवडणुकीत आमचे सरकार येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी यापेक्षा अधिक उत्साहाने जयंती साजरी केली जाईल. जिल्हा शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची (प्रा. रवींद्र बनसोड) निवड केल्याचे त्यांनी सूचित केले. यानंतर आ. सतीश चव्हाण म्हणाले की, शिवाजी महाराजांची जयंती एकदाच साजरी केली पाहिजे, महापौरांकडे पाहत तुम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगा. दोन वेळा जयंती साजरी करण्याची पद्धत बंद करा. चव्हाण यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे महापौर असलेले नंदकुमार घोडेले यांनी आ. चव्हाण यांना चांगलाच टोला लगावला. ‘चव्हाण साहेब तुमच्या नेत्यांचे आणि मातोश्रीचे चांगले जमते.
त्यांच्यासोबत तुम्हीसुद्धा जेवणाला असता. तुमचे नेते (शरद पवार) आमच्या नेत्याचे (खा. चंद्रकांत खैरे) नाव घेतात. त्यामुळे तुम्हीच त्यांना शिवजयंती एकत्र साजरी करण्याविषयी सांगा. मी छोटा पडतो.’ कल्याण काळे यांनी केलेल्या टिपणीलाही घोडेले यांनी उत्तर दिले. ‘येत्या दोन महिन्यांतच कळेल. निवड योग्य की अयोग्य ते. मला शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष केले, तेव्हा निवड योग्य होती. (हशा) मात्र, गणपतीला साक्षी ठेवून सांगतो, यावर्षीची निवड अयोग्यच ठरणार आहे.
राजकीय नेत्यांच्या या वक्तव्यांवर राजकारणात नव्याने येऊ पाहत असलेले व खासदारकीचे स्वप्न उराशी बाळगून असलेले उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. बनसोड यांनीही जोरदार टोलेबाजी केली. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणत, तेहतीस कोटी देवांची नावे एका बाजूला आणि एकट्या शिवाजी महाराजांचे नाव एका बाजूला असते. एकदा का ‘शिवाजी महाराज की जय’ म्हटले की लोक देव विसरून जातात. आपण (महापौर) गणपतीला साक्षी ठेवून भविष्यवाणी केली; पण आमदार, खासदार, मंत्री पदापेक्षाही शिवाजींचा मावळा हे पद मला मोठे वाटते. त्यामुळे माझी निवड अयोग्य असूच शकत नाही. आपण कितीही देव पाण्यात घातले तरी मला मोठे होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. तीन अपत्ये असल्यामुळे मला नगरसेवकपदाची निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे मी आमदार, खासदार होणारच. त्यापासून कोणी रोखू शकत नाही.’
पोलीस आयुक्तांची हसून दादराजकीय नेत्यांच्या या टोलेबाजीला पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद मात्र हसून दाद देत होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राजकीय टोलेबाजी झाल्यानंतर ही सर्व मंडळी मिरवणुकीत सहभागी झाली. तिथेही छायाचित्रासाठी एकमेकांना मागे ढकलण्याची स्पर्धा दिसली.