योगेश पायघन
औरंगाबाद : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. यावर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना दोनऐवजी प्रत्येकी एक गणवेश शिवून दिला जाणार आहे. त्यापैकी पाचवी ते आठवीपर्यंतच्या ५८ हजार ४०२ विद्यार्थ्यांचे ३०० प्रमाणे १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. यात राजकारण्यांचा लुडबुड करण्याचा प्रयत्न होता. मात्र, तो हाणून पाडत नियमानुसार निधी शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश खरेदी होणार असून, लवकरच मापे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनींना सर्व शिक्षा अभियानातून दरवर्षी गणवेश वाटप केले जातात. यावर्षी जिल्ह्याला ८ कोटी ७७ लाख ९० हजार २०० रुपयांचा निधी गणवेशासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मंजूर आहे. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने २० नोव्हेंबरला राज्य शासनाने दोनऐवजी एकच गणवेश वाटपाच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियानाकडे ३ कोटी ४२ लाख ६ हजारांचा निधी प्राप्त झाला. आणखी लागणाऱ्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश वाटपासाठी ४ कोटी ३८ लाख ९५ हजारांचा निधी खर्चासाठी लागणार आहे. एका ड्रेससाठी सुमारे तीनशे रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत पाचवी ते आठवीपर्यंतच्या ५८ हजार ४०२ विद्यार्थ्यांचे ३०० प्रमाणे १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपये निधी वितरित करण्यात आला आहे, असे सोज्वल जैन यांनी सांगितले.
---
शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश
शाळा व्यवस्थापन समितीला कापड व शिलाईसाठी निधी दिला जातो. त्यामुळे वितरणाची जबाबदारी शाळा प्रशासनातील संबंधित जबाबदारी असलेले शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती निधी वितरित झाल्यावर कापड खरेदी करेल. पाचवी ते आठवीपर्यंतच्या गणवेशाचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना माप देण्यासाठी शाळेत यावे लागते. सध्या शाळा सुरू नसल्याने विद्यार्थी शाळेत येत नाहीत. लवकरच कापड खरेदी व विद्यार्थ्यांचे कपडे शिवण्यासाठी माप घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.
-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, जि. प. औरंगाबाद
जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी
मुलेः ४१,४५७
मुली: १,०४,८६०
---
१,४६,३१७
गणवेश लागणार
---
पाचवी ते आठवीसाठी निधी वितरित--
सर्व मुली - ४२,१६१
अनुसूचित जाती मुले - ६,१९९
अनुसूचित जमाती मुले - ३,८५८
दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले - ६,१८४
पाचवी ते आठवी लाभार्थी विद्यार्थी - ५८,४०२
वितरित निधी - १,७५,२०,६००