औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांचा झालेला पराभव खळबळजनक व आश्चर्यकारक तर आहेच परंतु तेवढाच नामुष्कीचाही आहे. हा पराभव नेमका कशामुळे झाला, याची कारणमिमांसा होणेही गरजेचे आहे.
बिगरशेती मतदार संघाच्या ५ जागांसाठी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख नेते म्हणून हरिभाऊ बागडे यांच्यासह नितीन पाटील, सतीश चव्हाण, अंबादास दानवे व अभिजीत देशमुख हे उमेदवार होते. या मतदार संघातून प्रतिस्पर्धी पॅनलचे उमेदवार जगन्नाथ काळे, अपक्ष अभिषेक जैस्वाल हे निवडून आले. खरंतर हे दोघेच हरिभाऊ बागडे यांना नडले, असे म्हणता येईल. हरिभाऊ बागडे आणि कल्याण काळे-जगन्नाथ काळे यांचे राजकीय वैर सर्वश्रुतच आहे. काळे बंधूंनी बागडे नाना यांच्या पराभवासाठी प्रयत्न केला ही गोष्ट खरीच. परंतु, अभिषेक जैस्वाल हे भाजपचे कार्यकर्ते या निवडणुकीत उगवले आणि त्यांनी विजयही खेचून आणला.
हरिभाऊ बागडे यांनी मतदारांना कसलीही आमिषे वा प्रलोभने दाखवली नाहीत. ते त्यांच्या स्वभावानुसार मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी न घेता, दूरध्वनीव्दारे संपर्क करत राहिले. ‘मी ठरवून टाकले होते चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवायची नाही, मतदारांना लक्ष्मी दर्शन होऊ द्यायचे नाही’ असे प्रतिनिधीशी बोलताना हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले. तसेच मतपत्रिकेवर बिगरशेती मतदार संघाच्या उमेदवारांमध्ये माझा क्रमांक तेरावा होता. कदाचित त्याचाही फटका बसला असेल. अर्थात जिल्हा बँकेतून जरीे मी मुक्त होत असलो, तरी सहकार क्षेत्रातील माझी सेवा चालूच राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. पॅनलमध्ये दामूअण्णा नवपुते यांचे नसणे आणि मंगल वाहेगावकर यांचा समावेश करणे ही रणनीती चुकली का, त्यामुळे बागडे यांच्या मतांवर काही परिणाम झाला का, याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
ऐनवेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या निवडणुकीत उडी घेतली व हरिभाऊ बागडे यांना वयानुसार घरी बसण्याचा सल्ला दिला. वय झाले असले तरी हरिभाऊ बागडे कार्यक्षम आहेत. आमदार म्हणून ते फुलंब्री मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतच आहेत. स्वतः स्थापन केलेल्या देवगिरी सहकारी बँक, राजे संभाजी साखर कारखाना, अनेक शैक्षणिक संस्था चालविण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. शिवाय ते आर्थिक शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये अध्यक्ष या नात्याने त्यांनी आणलेली आर्थिक शिस्त वाखाणण्याजोगी आहे. त्यांची आर्थिक शिस्तही त्यांच्या पराभवाचे कारण असू शकेल, असे राजकीय जाणकार मानतात. हरिभाऊ बागडे यांचा पराभव एकीकडे आणि बँकेच्या निवडणुकीचा सारा निकाल एकीकडे अशी आजची परिस्थिती आहे. हरिभाऊ बागडे यांच्या पराभवाने अनेक बरे-वाईट संदेश दिले आहेत, एवढे मात्र नक्की.