सत्ताकारण ! काँग्रेसचे अनेक जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 06:57 PM2019-05-28T18:57:34+5:302019-05-28T19:01:31+5:30
प्रमुख सदस्यांना चर्चेसाठी मुंबईचे निमंत्रण
औरंगाबाद : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रवेशाच्या वेळी आपल्यासोबत जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या १०-१२ सदस्यांचा प्रवेश घडवून आणण्याची व्यूहरचना आखली असून, यासंदर्भात त्यांनी काँग्रेसच्या प्रमुख जि.प. सदस्यांना उद्या मुंबईत चर्चेसाठी बोलाविले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कारवाई केली. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजप पक्षश्रेष्ठींसोबत जवळीक वाढविली. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना सोबत औरंगाबाद जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या १०-१२ सदस्यांना घेऊन जाण्याबाबत त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. उद्या मुंबईत यासंदर्भात काही प्रमुख जि.प. सदस्यांसोबत चर्चा केली जाणार आहे, तसा निरोप सदस्यांना मिळाला आहे.
जिल्हा परिषदेत सध्या शिवसेना-काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. यापुढे जिल्हा परिषदेतील सेनेसोबतची आघाडी तोडून भाजपसोबत घरोबा करण्याचा निर्णय बंडखोर काँग्रेस सदस्यांनी घेतला आहे. यासाठी अगोदर काँग्रेसचा स्वतंत्र गट स्थापन करावा लागणार आहे. गट स्थापन करण्यासाठी एकूण १६ काँग्रेस सदस्यांपैकी दोन तृतियांश सदस्य म्हणजे ११ सदस्य एकत्र आले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून सध्या ११ सदस्यांची जुळवाजुळव सुरू आहे. गट स्थापन करण्यापूर्वी या सदस्यांनी पाऊल उचलले, तर त्यांचे जि.प. सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे काँग्रेसच्या स्वतंत्र गटात सहभागी होण्यासाठी उद्याच्या मुंबईतील बैठकीत सदस्यांसोबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अध्यक्ष ‘सेफ झोन’मध्ये
काँग्रेसच्या जि.प. सदस्यांचा भाजपसोबत सत्ता स्थापण्याकडे कल, या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रसिद्ध झाली. त्यानंतर जि.प.तील सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. हाती असलेली सत्ता जाऊ नये, यासाठी अध्यक्ष व काही सभापतींनी वरिष्ठ पातळीवर ‘फिल्डिंग’ लावल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील जि.प. अध्यक्षांना चार-पाच महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी अनेक जि.प. अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदा भाजपच्याच ताब्यात आहेत. विधानसभा निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष किंवा इच्छुकांची नाराजी नको, म्हणून जि.प. अध्यक्षांना मुदतवाढ मिळेल, अशी चर्चा आज दिवसभर जिल्हा परिषदेत होती.