औरंगाबाद : मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या शासकीय कारवर आणि नूतन कॉलनी येथील घरावर शुक्रवारी रात्री हल्ला करून दगडफेक करण्यात आली. हा हल्ला भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांनी केल्याचा स्पष्ट आरोप डॉ. कराड यांनी केला आहे, तर हा प्रकार म्हणजे भाजपचा स्टंट असल्याची प्रतिक्रिया तनवाणी यांनी दिली आहे.
दरम्यान कार आणि घरावर हल्ला झाल्याप्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने क्रांतीचौक ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हल्ल्याची घटना शहरात पसरताच रात्री क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या परिसरात शेकडो भाजपसमर्थक दाखल झाले. खा. अमर साबळे हेदेखील क्रांतीचौकात आले. तेथे हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. दगडफेक करणा-यांना अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीचौक पोलिसांना देण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कराड यांचे नूतन कॉलनी येथे निवासस्थान आहे. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ते कार्यकर्त्यांशी गप्पा मारत बसले होते. तेव्हा रंगनाथ राठोड (रा. हर्सूल) आणि संतोष सुरे (रा. मयूर पार्क) हे त्यांना भेटायला आले. यावेळी दोघांनी त्यांच्याकडे महापालिकेचे तिकीट मागण्यासाठी आल्याचे सांगितले. यावेळी बाहेर उभे असलेल्या काही लोकांनी अचानक डॉ. कराड यांच्या शासकीय कारवर मागील बाजूने दगड मारून काच फोडली. या प्रकारानंतर राठोड आणि सुरे तेथून निघून गेले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, अनिल गायकवाड, क्रांतीचौक ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर घटनास्थळी धावले.
पोलीस आयुक्तांची भेट आ. अतुल सावे, डॉ. कराड, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, नगरसेवक अनिल मकरिये, बापू घडमोडे, भावराव देशमुख आणि अन्य पदाधिकाºयांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. यानंतर हे शिष्टमंडळ क्रांतीचौक ठाण्यात गेले आणि रीतसर तक्रार दिली. दरम्यान, आ. अतुल सावे यांनी दगडफेक करणाºयांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, अशा पद्धतीने जर कृती असेल, तर आम्हीदेखील आमच्या पद्धतीने उत्तर देऊ.
कराड यांचा आरोप; मला धमक्याही आल्याघटनेबाबत डॉ. कराड म्हणाले, ‘लोकमत’शी बोलताना गुरुवारी मी भाजपतून शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल किशनचंद तनवाणी यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे तनवाणी समर्थकांनी शासकीय चारचाकीवर हल्ला केला आहे. तनवाणी समर्थकांनी हा हल्ला केला असून, त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. तनवाणी यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातदेखील काही घाणेरड्या पोस्ट केल्या आहेत. सचिन झव्हेरी या प्रकरणात समोर आलेले नाहीत; परंतु संतोष सुरे व इतर चार ते पाच जणांनी मला दमदाटी केली. वर्तमानपत्रात बातम्या द्याल, तर याद राखा, अशी धमकी त्यांनी दिली. तनवाणी यांना ‘सत्तेच्या ढेपेला लागलेला मुंगळा’ असे ‘लोकमत’शी बोलताना केलेले वक्तव्य व त्यानंतर आलेली बातमी तनवाणी व त्यांच्या कार्यकर्त्यांना झोंबल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी दगडफेक केली आहे.
हल्ला म्हणजे भाजपची निव्वळ स्टंटबाजीमाझ्या कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीचे कृत्य होणारच नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी सकाळीच ‘लोकमत’ वाचून हल्ला केला असता. सायंकाळी कशासाठी करतील. मी कार्यालयात बसून आहे. मलाही आताच अशी घटना घडल्याचे कळले. कराड यांच्या मुलासोबत मी थोड्या वेळापूर्वी संवादही साधला. मला बदनाम करण्यासाठी कराड यांनी रचलेला हा स्टंट आहे. - किशनचंद तनवाणी, माजी आमदार.