गेवराई : तालुक्यातील मारफळा येथे खडी क्रेशर मशीन व डांबर मिक्सींगचे काम अविरतपणे सुरू आहे. या कामामुळे परिसरातील घरांना तडे गेले असून, प्रदूषण वाढत चालले आहे. परिणामी शेकडो ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या कामावर बंदी आणावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तालुक्यातील कल्याण -विशाखापट्टणम् या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या कामासाठी एका खाजगी कंपनीचे खडी व डांबर मिश्रण केंद्र थाटण्यात आले आहे. मिश्रण करण्यासाठी तालुक्यातील मारफळा गावाजवळ हे काम अहोरात्र सुरू आहे. या केद्रांद्वारे प्रदूषण होत असून, पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. तसेच या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबरोबर शेतीचे नुकसान होत आहे. केंद्रावर ब्लास्टिंग होत असल्याने गावातील घरांना तडे गेले आहेत. डांबर मिश्रणामुळे धुरांचे लोळ निर्माण होऊन आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्या खडी क्रेशरची धूळ येथील घरात व शेतात पडत आहे. यामुळे हे काम बंद करावे, या मागणीचे निवेदन गावातील शरद कबले, बाबासाहेब वैद्य, नारायण डरफे, कैलास पवार, अरूण कुटे, विठ्ठल गिरी, भास्कर माने यांनी तहसीलदार व जिल्हाअधिकारी यांना दिले आहे. याची दखल घ्यावी नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या संदर्भात तहसीलदार संजय पवार म्हणाले, याप्रकरणाची चौकशी करुन पुढली कारवाई करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
खडी क्रशर मशीनमुळे प्रदूषण
By admin | Published: June 05, 2016 11:52 PM