जालना : शहरात वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे ६० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. तर कालबाह्य वाहनांमुळे प्रदूषणास मोठा हातभार लागत असल्याचे तब्बल ८० टक्के नागरिकांचे मत आहे. लोकमतने वाढत्या प्रदूषणाबाबत सर्व्हेक्षण करून नागरिकांची मत जाणून घेतले. यावेळी अनेकांनी या प्रश्नांसोबतच इतर प्रश्नही उपस्थित करून प्रदूषण मंडळावर बोट ठेवले. लोकमत सर्व्हेक्षणासाठी नागरिकांना पाच प्रश्न विचारण्यात आली. शहरात वाहनांमुळे प्रदूषण वाढले आहे का? या प्रश्नावर ६० टक्के नागरिक होय म्हणतात. ३० टक्के नागरिकांना हे चुकीचे वाटते तर १० टक्के नागरिकांना याची माहिती नसल्याने ते तटस्थ राहिले. कालबाह्य वाहनांच्या वापरामुळे प्रदूषण वाढते का यावर ८० टक्के नागरिक होय म्हणतात. ५ टक्के नाही म्हणतात तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. कालबाह्य वाहनांमुळेच प्रदूषण वाढत असल्याचे बहुतांश नागरिकांचे म्हणणे आहे. वाहनचालकांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ जागृती करते का? २० टक्के होय म्हणतात. ७५ टक्के नागरिक नाही म्हणतात. ५ टक्के नागरिकांचे काहीच म्हणणे नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वाढत्या प्रदूषणाकडे कानाडोळो हातोय का? यावर ५५ टक्के नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळावरच खापर फोडले. ३० टक्के नाही म्हणतात. १५ टक्के नागरिकांना याबाबत माहीत नाही असे उत्तर दिले. पीयूसी करण्याबाबत वाहनचालक आग्रही आहेत का? ४५ टक्के नागरिक होय म्हणतात.५० टक्के नाही म्हणतात तर ५ टक्के माहीत नाही म्हणतात. एकूणच नागरिकांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. लोकमतने विचारलेल्या प्रश्नांवर नागरिकांनी मते नोंदवून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तिखट प्रतिक्रिया देत प्रशासनाला धारेवर धरले. स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन करावे, अशी मागणीही काहींनी व्यक्त केली. काही वाहनचालक रिक्षा, दुचाकी तसेच जीप व ट्रकमध्ये सर्रास रॉकेलचा वापर करतात. यामुळेही प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वाहने कालबाह्य झाल्यानंतरही थोडीबहुत दुरूस्ती करून धावतात.यामुळेही प्रदूषण वाढत आहे. शहरातील प्रदूषणासोबतच धुळीचा प्रश्नही गंभीर बनल असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. प्रदूषण व धुळीमुळे श्वसनाचे आजार जडत असल्याचे काही वयोवृद्ध वाचकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कालबाह्य वाहनांच्या वापरामुळेच शहरात प्रदूषण
By admin | Published: March 11, 2016 12:54 AM