छत्रपती संभाजीनगर : शहरात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत आहे. मागील दोन वर्षांत १८ लाख टन कार्बन उत्सर्जन झाल्याचा अभ्यास महापालिकेने नियुक्त केलेल्या ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट इंडिया’ या संस्थेने केला आहे. कार्बन उत्सर्जनाचे हे प्रमाण चिंतेत टाकणारे असून, आतापासूनच व्यापक उपाययोजना करणे खूप गरजेचे असल्याचे संस्थेने महापालिकेला दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
शहराचा पहिला वातावरणीय बदल कृती आराखडा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. हा आराखडा ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट इंडिया’ या संस्थेने तयार केला. डिसेंबर, २०२१ मध्ये महापालिकेने संबंधित संस्थेसोबत करार केला होता. संस्थेने जानेवारी, २०२२ मध्ये कामाला सुरुवात केली. आराखडा तयार करण्यासाठी संस्थेला दोन वर्षांचा अवधी लागला. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये महापालिकेने कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी नाल्यांवर व्हर्टिकल गार्डन तयार केले. हे उपाय फारसे प्रभावी ठरत नसल्याचे निदर्शनास आले.
खासगी वाहनांचा वापर वाढलाशहरात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही वाढू लागले. हे रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. स्मार्ट सिटीच्या शहर बस सुरू आहेत, पण त्या डिझेलवर चालणाऱ्या आहेत. सीएनजी किंवा ई-बसचा वापर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत जास्त असावा, असे अहवालात नमूद आहे.
हरित पट्टे, ऑक्सिजन हबकाँक्रीटीकरणामुळे तापमानात वाढ होतेय. लोकसंख्या वाढू लागली. त्या तुलनेत वृक्षारोपणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हरित पट्टे, ऑक्सिजन हब ठिकठिकाणी तयार करणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या बाजूने, दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करावे, असेही आराखड्यात म्हटले आहे. भारतीय प्रजातींची किंवा मराठवाड्यात आढळणारी, वाढणारी झाडे लावण्याचे काम पालिकेने प्राधान्याने करावे, असे म्हटले आहे.