औरंगाबाद : परळी येथील पूजा चव्हाण हिने काही दिवसापूर्वी पुण्यात आत्महत्या केली असून, तिच्या आत्महत्येला शिवसेनेचा मंत्री जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मत व्यक्त केले असून हे प्रकरण अत्यंत संवेदनशील व दुर्दैवी आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणाचे नाव जोडणे व अधिक बोलणे योग्य होणार नाही असे म्हंटले आहे.
पुण्यामध्ये २२ वर्षीय युवती पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर आता या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. महाविकासआघाडीमधील शिवसेनच्या एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात आले आहे. याबाबत काही ऑडीओ क्लीप सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. यामुळे विरोधकांनी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरत शिवसेनेवर चौफेर टीका सुरु केली आहे. मात्र, यावर शिवसेनेने अद्याप अधिकृत भूमिका घेतलेली नाही. यातच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद मध्ये याप्रकरणात मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. यामुळे यात चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणाचेही नाव जोडणे योग्य नाही. या दुर्दैवी प्रकरणात चौकशीअंती खरे काही पुढे येईल तोपर्यंत यावर अधिक बोलणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
मंत्र्यावरील आरोपांमुळे महाविकास आघाडी अडचणीतगेल्या पाच-सहा महिन्यांत नाजूक प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकारवर आरोप होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी दिशा सालियनची आत्महत्या, तसेच धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोप यामुळे सरकार अडचणीत सापडले होते. हे वाद निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.