वाळूज महानगर : रामराई ते जोगेश्वरी या तीन किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जोगेश्वरीतून वाळूज व गंगापूरला जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने नागरिक या रस्त्याने ये-जा करीत असतात. मात्र रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना रांजणगावमार्गे विळखा टाकून ये-जा करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सतीश देवकर, अशपाक बेग आदींनी केली आहे.
रांजणगाव फाट्यावर बेशिस्त वाहतूक
वाळूज महानगर : रांजणगाव फाट्यावर अॅपेरिक्षा चालकांनी अघोषित थांबा तयार केल्यामुळे या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत आहे. या फाट्यावर रस्त्याच्या मधोमध अॅपेरिक्षा बेशिस्तपणे उभ्या राहत असल्याने रांजणगाव, कमळापूर व सीएट कंपनीकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारक, प्रवासी व कामगारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रिक्षात प्रवासी भरण्यावरून चालकांत सतत वाद होऊन वाहतूक व्यवस्था ठप्प पडत असते. अॅपेरिक्षाबरोबर या फाट्यावर विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे थाटल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. बेशिस्त अॅपेरिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
उद्योगनगरीतून ऊसतोड मजूर बेपत्ता
वाळूज महानगर : उद्योगनगरीत नातेवाइकास भेटण्यासाठी आलेला ऊसतोड मजूर बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ज्ञानेश्वर श्रावण चव्हाण (३०, रा. मालखेडा, ता. जामनेर) हा २५ डिसेंबरला वाळूज एमआयडीसीत राहणारे मेहुणे गणेश राठोड यांना भेटण्यासाठी आला होता. दुसऱ्या दिवशी ऊसतोडीसाठी नगर जिल्ह्यात चाललो, असे सांगत ज्ञानेश्वर हा घराबाहेर पडला होता. मात्र, अद्याप ज्ञानेश्वर घरी न परतल्याने त्याचे वडील श्रावण चव्हाण यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. या बेपत्ता मजुराचा पोहेकॉ. सतीश जोगस हे शोध घेत आहेत.
धोकादायक डीपीचे स्थलांतर करा
वाळूज महानगर : वाळूजच्या ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या धोकादायक विद्युत डीपीचे इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. या डीपीलगतच ग्रामपंचायत कार्यालय, पोस्ट ऑफिस व तलाठी कार्यालय असल्याने नागरिक, शेतकऱ्यांची कामासाठी मोठी गर्दी होत असते. कामानिमित्त पालकांसोबत आलेली लहान मुले नकळतपणे विद्युत डीपीजवळ जात असल्याने गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत आहे. या धोकादायक डीपीचे इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी केली जात आहे.
उद्योगनगरीत ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली आहे. गत आठवड्यात थंडीचा कडाका वाढल्याने उबदार कपड्यांची जोरदार विक्री झाल्याचे सूरजप्रसाद, जगजीवन दास या विक्रत्यांनी सांगितले. आता थंडीचा जोर ओसरल्याने उबदार कपड्यांची विक्रीही मंदावली आहे. या ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्याने रबी हंगामातील गव्हाच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
--------------------------------