---------
मास्क नसतानाही एसटीत प्रवेश
औरंगाबाद : मास्क नसेल तर प्रवाशाला एसटीत प्रवेश देऊ नये, अशी सूचना आहे. परंतु ही सूचना केवळ कागदावरच आहे. मास्क नसतानाही प्रवाशांना अगदी सहज प्रवेश मिळत आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.
---------------
एसटी कॉलनीत राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात
औरंगाबाद : एसटी कॉलनी येथील श्री महारुद्र हनुमान मंदिरात राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाईं फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रामदास गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक पवार, सोसायटी अध्यक्ष देवनाथ जाधव, माणिक निकम, अशोक नवपुते, अशोक जगताप, राजकुमार बनसोड, नित्यानंद शिंदे, विठ्ठल आगलावे, अशोक अम्बूलगेकर, मनोहर कळसे, संदीप पगारे, रवींद्र देशपांडे, ॲड. विवेकानंद इंगळे, शरदचंद्र पाटील, भीमराव डोळस, मदन भारती, बाबूराव गायकवाड आदी उपस्थित होते. संदीप पगारे यांनी सूत्रसंचालन केले.
‘एसटी’च्या महाव्यवस्थापकांचा लवकरच दौरा
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कर्मचारी व औद्योगिक संख्या विभागाच्या महाव्यवस्थापकपदी माधव काळे यांची नियुक्ती करण्यात आली. अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची नेमणूक झाल्याने रखडलेल्या कामगार प्रश्नांला गती मिळेल, अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. आगामी दोन दिवसांत ते औरंगाबादला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
----------
घाटीत नो-पार्किंगमध्ये वाहने
औरंगाबाद : घाटीत बाह्यरुग्ण विभागासमोर नो-पार्किंग असताना, दुचाकी, चारचाकी, रिक्षा सर्रास उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे ओपीडी परिसराला पार्किंगचे स्वरूप येत आहे. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे रुग्णवाहिकांनाही अडथळ्याला सामोरे जावे लागते. याकडे घाटी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
----------
राजश्री कॉलनीत फुटलेले पथदिवे
औरंगाबाद : राजश्री कॉलनीतील रस्त्यावर ठिकठिकाणी फुटलेले पथदिवे दिसतात. पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. परंतु त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. लवकरात लवकर पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
---------
खडकेश्वर रस्त्यावर चेंबरचा धोका
औरंगाबाद : खडकेश्वर परिसरातून भडकलगेटकडे जाताना सिमेंट रस्त्यावर ड्रेनेज चेंबरच्या अडथळ्याला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या मधोमध असलेला चेंबर खोलगट आहे. त्यामुळे वाहनचालक आदळआपट टाळण्यासाठी अचानक ब्रेक मारतात. त्यातून अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे रस्ता आणि चेंबर समान करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.