छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा यशस्विनी महिला स्वयंसाहाय्यता गटाची सहकारी पतसंस्था घोटाळ्यातील आरोपींच्या जमिनी व मालमत्तांबाबत कोणताही फेरफार अथवा खरेदी-विक्री व्यवहार करण्यात येऊ नये, पोलिसांच्या अशा सूचना असतानाही महसूल आणि मुद्रांक विभागाने धामणगाव, रहाळपट्टी तांडा, पिसादेवी येथील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. यात महसूल प्रशासनाने जमिनीची फेरफार प्रक्रिया पूर्ण केली, तर मुद्रांक विभागाने रजिस्ट्री केली. या सगळ्या प्रकरणामुळे महसूल विभाग आणि मुद्रांक विभाग संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत.
मुद्रांक विभागाच्या मुख्यालयातील दुय्यम निबंधकांनी रजिस्ट्री करून दिली आहे. दोन निबंधक सध्या कार्यालयात नाहीत. याप्रकरणी मुद्रांक विभागाचे अधिकारी विवेक गांगुर्डे यांना विचारले असता, ते म्हणाले की, पोलिसांच्या पत्रानुसार पतसंस्थांच्या घोटाळ्याच्या तपासाअनुषंगाने मालमत्तांची रजिस्ट्री करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. तरीही हा प्रकार कसा झाला, हे तपासावे लागेल. दरम्यान, या प्रकरणात पोलिस आयुक्तालयात गुरुवारी तातडीची बैठक होणार आहे.
आरोपी रेकॉर्डवर फरार, रजिस्ट्रीला हजर...पतसंस्था घोटाळ्यातील आरोपी पवन अधाणे हा रेकॉर्डवर फरार आहे; परंतु जमिनीची रजिस्ट्री करून देताना मात्र मुद्रांक कार्यालयात हजर होता, असे रजिस्ट्रीच्या आधारे दिसते आहे. पोलिसांना आरोपी सापडत नाही. मग तो खुलेआमपणे रजिस्ट्री कार्यालयात कसा काय येतो, असा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी तहसीलदार रमेश मुंदलोड यांना विचारले असता ते म्हणाले, पवन अधाने यांच्या मालकीची जमीन विक्रीसाठी मुद्रांक विभागाने रजिस्ट्री करून दिल्यानंतर तहसील कार्यालयाने फेरफार मंजूर केला आहे.
दोन दिवसांचा अल्टिमेटमएमआयएमचे माजी खा. इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात प्रशासनाला व जमिनी, मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी रजिस्ट्रीआधारे फेर मंजूर केल्यामुळे त्यांनाही माहिती विचारली.
मुद्रांक विभागाची कोंडीमहसूल विभागाने मुद्रांक विभागाकडे चेंडू टाेलविला आहे. आधी रजिस्ट्री, मग फेर झाल्याचे कारण महसूलने पुढे केले आहे, तर ज्यांनी रजिस्ट्री केली ते दुय्यम निबंधक बदलून गेल्याने मुद्रांक विभागाची कोंडी झाली आहे. दरम्यान, आरोपींच्या स्थावर, मालमत्ता ज्या गटात आहेत, तो गट लॉक केला, तरच रजिस्ट्री व फेर घेण्यावर बंधन येऊ शकते.