औरंगाबाद : जिल्ह्यातील ११ लाख ५९ हजार ९६ नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. त्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५५९ गावे आणि २० वाड्यांमधील हे नागरिक असून, दिवसागणिक पाणीटंचाईची समस्या रौद्ररूप धारण करीत आहे. परिणामी टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ आजच्या स्थितीत ७४६ टँकरच्या १५४१ फेऱ्या सुरू आहेत़कमी पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे़ औरंगाबाद, जालनासोबतच जवळपास २०० गावांना आणि औद्योगिक परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडीतील मृत साठ्यातून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे़ उर्वरित लघु आणि मध्यम प्रकल्प जवळपास कोरडे पडले आहेत. काही धरणांमध्ये जोत्याच्या खाली पाणी आहे. ़विहीर, बोअरचेही पाणी आटले आहे़ त्यामुळे उन्हात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ टँकरमधून पाणीपुरवठा करण्यासाठी बहुतांश ठिकाणी ४० ते ६० कि. मी. वरून वाहनांना फेऱ्या माराव्या लागत आहेत़़ औरंगाबाद जिल्ह्यात सध्या सर्वाधिक १८३ टँकर वैजापूर तालुक्यात सुरू आहेत़ यापाठोपाठ गंगापूर, पैठण तालुक्यांचा समावेश आहे़ सर्वात कमी टँकर सोयगाव तालुक्यात आहेत. प्रशासनाकडून खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात येत आहेत.
११ लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण
By admin | Published: May 01, 2016 1:28 AM