औरंगाबाद : एका घरातून तीन मोबाईल चोरल्यानंतर एका मोबाईलमधील व्हॉट्सॲपवरून विविध ग्रुप आणि सभासदांना अश्लील मेसेज आणि छायाचित्रे टाकणाऱ्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने १७ मे रोजी पकडले.
आरोपीकडून चोरीचे तीन मोबाईल जप्त केले. अजय बाबासाहेब गायकवाड (वय २२, रा. अशोकनगर, मसनतपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको एन २ येथील महालक्ष्मी चौकाजवळ राहणाऱ्या महिलेच्या घराच्या खिडकीतून हात घालून चोरट्यांनी तीन मोबाईल चोरून नेले होते. यापैकी एकाच मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप होते. संबंधितांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
आरोपीने हा व्हॉट्सॲप असलेला मोबाईल सुरूच ठेवला. अन्य मोबाईल बंद ठेवले होेते. सुरू असलेल्या मोबाईलच्या व्हॉट्सॲपमधील विविध ग्रुपवर तो अश्लील छायाचित्रे आणि मेसेज पाठवू लागला. ही बाब ग्रुपमधील काही लोकांना खटकली आणि त्यांनी त्या महिलेस ही बाब सांगितली. यामुळे महिलेने गुन्हे शाखेत येऊन माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, सहायक उपनिरीक्षक रमाकांत पटारे, शेख हबीब, हवालदार विजय निकम, राजेंद्र साळुंके, तात्याराव शिनगारे, अश्वलिंग होनराव, संतोष सानप आणि नितीन देशमुख यांच्या पथकाने तपास करून अजय गायकवाडला नारेगाव परिसरात पहाटे शोधून काढले.
त्यावेळी त्याच्याजवळ तो मोबाईल आढळला. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य दोन मोबाईलही पोलिसांच्या हवाली केले. अजय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोर आहे. त्याच्याविरोधात मुकुंदवाडी, सिडको आणि लोहमार्ग पोलीस ठाण्यात पाच गुन्ह्यांची नोंद आहे.