औरंगाबाद : औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाॅझिटिव्ह होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. एकट्या घाटीत गेल्या १५ दिवसांत ३० निवासी डाॅक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. आता आरोग्य कर्मचाऱ्यांना अपुऱ्या मनुष्यबळामुळे कोविडसह नाॅनकाेविड रुग्णसेवेचा भार सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे.
निवासी डाॅक्टर, परिचारिका हे घाटीतील रुग्णसेवेचा कणा समजले जातात. कोरोना रुग्णांसाठी घाटीतील प्रत्येक कर्मचारी मागील वर्षभरापासून अहोरात्र झटत आहेत. घाटीत उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी भर पडली आहे. अशा परिस्थितीत घाटी प्रशासनाला कोरोनासह अन्य आजारांच्या उपचार सुरळीत ठेवण्याची कसरत करावी लागत आहे. तथापि, निवासी डाॅक्टर, परिचारिकांमध्ये कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे घाटीतील वरिष्ठ डाॅक्टरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयांनाही मनुष्यबळाच्या समस्येला समोरे जावे लागत आहे.
बाधित होण्याचे प्रमाण वाढले
ज्या निवासी डाॅक्टरांच्या खांद्यावर घाटीत कोविड रुग्णसेवेचा भार आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून काेरोना पाॅझिटिव्ह येण्याऱ्या निवासी डाॅक्टरांची संख्या वाढत आहे. जवळपास ३० निवासी डाॅक्टर काेरोनाबाधित झाले असून, प्रशासनाने लवकरात लवकर कंत्राटी डाॅक्टरांची पदे भरली पाहिजेत.
- डाॅ. आबासाहेब तिडके, अध्यक्ष, मार्ड
वेळीच पदे भरणे गरजेचे
परिचारिकांची पदे वेळेवर भरली जात नाहीत. त्यामुळे अशा महामारीच्या काळात परिचारिकांचा तुटवडा जाणवत आहे. दरवर्षी पदे भरली असती तर मनुष्यबळाचा असा प्रश्न उद्भवला नसता. सध्या १० ते १२ परिचारिका कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- इंदुमती थोरात, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र गर्व्हमेंट नर्सेस फेडरेशन
मनुष्यबळाची अडचण
खासगी रुग्णालयांमध्येही सध्या मनुष्यबळाची मोठी अडचण झाली आहे. कोरोनासह अन्य आजारांचेही खूप रुग्ण आहेत. केवळ खाटा वाढवून होणार नाही. १० दिवस कोरोना रुग्णसेवा दिल्यानंतर डाॅक्टरांना ३ दिवस सुटी दिली जाते. त्यानंतर पुढील १० दिवस त्यांना नाॅन काेविडच्या ठिकाणी रुग्णसेवा द्यावी लागते. डाॅक्टरांसह परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची गरज आहे. मराठवाड्यातील नर्सिंग महाविद्यालयांच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते.
-डाॅ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असोसिएशन