लातूर : ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे़ या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्यांची केविलवाणी वणवण गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे़ एटीएम आणि बँकामध्ये पैसे भरून शंभराच्या नोटा मिळविण्यासाठी पहाटेपासून रांगा लागल्या आहेत़ परिणामी, बाजार पेठातील व्यवहार ठप्प झाले आहेत़ जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला आणि किराणा खरेदीसाठीही पैसे नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे़ दैनंदिन गरज भागविण्यासाठी घरात पैसा नसल्याने सामान्य लोकांनी ‘लोकमत’शी भावना व्यक्त केल्या़ किराणा माल, भाजी, दूध खरेदीला पैसे नाहीत़ संसार कसा चालवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ एक, दोन दिवसात परिस्थिती निवळेल, असे सांगितले जात होते़ मात्र ती अधिक बिकट होत चालली आहे़ कमाईचे दहा, वीस हजार रूपये असताना तो खर्च करता येत नाही़ बदलूनही दिला जात नाही, अशी परिस्थिती या निर्णयामुळे आमच्यावर ओलांडली असल्याची संतप्त प्रतिक्रिया बँकांसमोर रांगा लावलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या़ शहरातील स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ इंडिया, भारतीय स्टेट बँक, औसा रोडवरील आयसीआसीआय बँक, बँक आॅफ बडोदा, गंजगोलाई परिसरातील सेंट्रल बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ हैद्राबाद आदी बँकासमोर रांगेत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला असता, अशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या़ अनेकांची भाजी आणि किराणा घेण्याची ऐपत सध्या नाही़ उसनवारी करावी तर कोणाकडेही पैसा नाही़ पैसा असून ही अवस्था या निर्णयाने झाली असल्याने नागरिक म्हणाले़
सर्वसामान्यांची केविलवाणी वणवण
By admin | Published: November 13, 2016 12:44 AM