एकशे पंधरा वर्षीय आजीने कोरोनावर केली मात
गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील घटना :
जयेश निरपळ
गंगापूर : कोरोनाची लागण झाली असे जरी कळले तरी पायाखालची जमीन सरकते. त्यात वयोवृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर आता काही खरे नाही, असे म्हटले जाते. मात्र, तालुक्यातील वाहेगाव येथील तब्बल ११५ वर्षीय आजीने जगण्याची जिद्द, अन् प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोना आजारावरही यशस्वी मात केली आहे. छबाबाई नाथा कोरडे असे कोरोनाला हरविणाऱ्या जिगरबाज आजीचे नाव आहे.
वाहेगाव येथील छबाबाई नाथा कोरडे यांचे सध्याचे वय साधारणपणे ११५ असून त्यांना वृद्धापकाळाने स्वतः चालता येत नाही. उठून बसता येत नसल्याने त्या अंथरुणावर पडून असतात. घरात त्यांची देखभाल करणाऱ्या नातीला कोरोनाची लागण झाल्याने आजीदेखील पॉझिटिव्ह झाल्या. त्यांना ५ मे रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर असून तीस ते चाळीस वयोगटातील अनेक जण बाधित होत असल्याने सर्वांनीच कोरोनाचा धसका घेतला आहे. पण छबूबाईला वयोमानानुसार कोरोना काय हेच समजले नसल्याने त्या बिनधास्त होत्या. त्यात शंभरी पार केलेल्या या आजीची रोगप्रतिकारक शक्ती कमालीची होती. ऑक्सिजन लेव्हल सुरवातीपासूनच स्थिर असल्याने आजीला त्रास कमी होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या उपचाराला कमालीचा प्रतिसाद दिला.
कोरोना हा विषाणू शरीरात केवळ संसर्गच पसरवत नाही. तर नैराश्य, विस्मरण आणि मानसिक या आजारांनाही निमंत्रण देतो. मात्र या बाबींचा आश्चर्यकारकरीत्या आजीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे डॉक्टरांना सहज उपचार करणे शक्य झाले. अवघ्या दहा दिवसातच आजी ठणठणीत बऱ्या होऊन शनिवारी दि.१५ नातू वसंत कोरडे सोबत घरी परतल्या. आजींच्या जिद्दीसोबतच नोडल अधिकारी डॉ. सुदाम लगास, डॉ. नुमान शेख, सचिन सातपुते, प्रफुल्ल गायकवाड, परिचारिकांनी त्यांची योग्य देखभाल करून शुश्रूषा केल्याने आजी कोरोनावर विजय मिळवू शकल्या.
अन्य रुग्णांना दिली जगण्याची प्रेरणा
आपल्याला नेमका कोणता आजार झाला याची पुसटशीही कल्पना नसलेल्या आजीने जिद्द, इच्छाशक्ती व स्वतःमध्ये असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर कोरोनाला परतवून लावले. कोरोना झाल्यावर वेळीच योग्य औषधोपचार व काळजी घेऊन कोरोनाचा बाऊ न करता जगण्याची सकारात्मक दृष्टी ठेवल्यास या आजारावरही मात करता येते. तसेच या रुग्णांनी कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे जाणे किती महत्त्वाचे आहे. हे या ११५ वर्षीय छबूबाईंनी दाखवून देऊन रुग्णांना जगण्याची नवी प्रेरणा दिली आहे.