औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये दोन-तीन दिवसांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयाची खरोखर गरज आहे का, याचा प्रशासनाने विचार करावा, अन्यथा औरंगाबादच्या उद्योगांवर याचा दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भीती उद्योजक रिषी बागला यांनी व्यक्त केली.
औरंगाबादेत शुक्रवारपासून पुन्हा नऊ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना उद्योजक रिषी बागला यांनी इथल्या उद्योग क्षेत्राबाबत होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, प्रशासन चुकीचा निर्णय घेत नाही, हे मान्य आहे; परंतु या निर्णयामुळे औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. येथील अनेक उद्योग सिंगल सोर्सच्या माध्यमातून देश-विदेशातील उद्योगांना माल पुरवठा करीत आहेत. या लॉकडाऊनमुळे येथील उद्योग बंद राहतील व देश-विदेशात माल पुरवठा करण्याची चेन खंडित होईल. त्याची मोठी किंमत इथल्या उद्योगांना चुकवावी लागेल. याचा परिणाम येथील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर किती प्रमाणात होईल, किती उद्योग बंद पडतील, इथले काही उद्योग दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार करतील का, लोकांचा औरंगाबाद शहरावरील विश्वास कमी होईल का, ही वेळच सांगेल.
ते म्हणाले, कचरा, पाणी यासारख्या कारणांनी आधीच औरंगाबादची बदनामी झाली आहे. आता कोविडच्या पार्श्वभूमीवर इथले प्रशासन नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले, हा संदेश जागतिक स्तरावर गेला तर येथील आॅरिक सिटी किंवा औद्योगिक वसाहतींवर काय परिणाम होऊ शकतो, ते पाहावे लागेल. अजूनही प्रशासनाने दोन-तीन दिवसांत परिस्थितीचा आढावा घ्यावा. १४४ कलम लागू करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत. यामुळे व्यवहार सुरळीत चालतील, अर्थचक्र पूर्वपदावर येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा बागला यांनी व्यक्त केली.
संपूर्ण अर्थचक्र थांबेल : जिल्ह्याची २० लाख लोकसंख्या गृहीत धरली, तर सध्या ६ हजार लोक कोरोनाबाधित झाले आहेत. म्हणजे, ०.३ टक्के लोक प्रभावित झालेले असून, ९९.७ टक्के लोक अजूनही कोरोनापासून दूर आहेत. या ०.३ टक्के संसर्ग झालेल्या लोकांसाठी संपूर्ण औरंगाबादकरांना वेठीस धरले आहे, ही विचार करायला लावणारी बाब आहे. यामुळे संपूर्ण अर्थचक्र थांबणार आहे. लॉकडाऊनपेक्षा अन्य काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते, असे बागला म्हणाले.