महापालिका निवडणुकीतही ‘महाशिवआघाडी’ची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 02:59 PM2019-11-18T14:59:29+5:302019-11-18T15:07:41+5:30

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाचे पडसाद

The possibility of a 'Mahashivaaghadi front' even in municipal elections | महापालिका निवडणुकीतही ‘महाशिवआघाडी’ची शक्यता

महापालिका निवडणुकीतही ‘महाशिवआघाडी’ची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेच्या निवडणुकीत युती होणे अशक्य काँग्रेस-राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याचे संकेत

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाशिवआघाडी सत्तेत आल्यास औरंगाबाद महापालिकेतही राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुकीतही महाशिवआघाडी निवडणुकीला सामोरे जाईल. या आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला महापालिकेत कधी नव्हे ते आता ‘अच्छे दिन’येण्याची शक्यता आहे. भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन तिन्ही पक्षांचे इच्छुक चांगलेच कामाला लागले आहेत.

औरंगाबाद शहरात प्रथमच प्रभाग पद्धतीने महापालिकेची निवडणूक घेण्यात येणार आहे. प्रभाग पद्धतीत आजपर्यंत ज्या महापालिकांमध्ये निवडणूक घेण्यात आली तेथे भाजपला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. त्यामुळे औरंगाबादेतही प्रभाग पद्धतच असावी यावर भाजपचा सर्वाधिक भर आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे सध्या प्रभाग पद्धतीचे कामही सुरू आहे. २१ नोव्हेंबर रोजी प्रभाग पद्धतीचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त अशा तीन सदस्यांच्या समितीसमोर जाईल. डिसेंबरअखेरीस आरक्षणासाठी ड्रॉ पद्धतीचा अवलंब केल्या जाणार आहे.

महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.  काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षांच्या सहकार्याने बहुमताचा आकडा महापालिकेत गाठता येऊ शकतो. महापालिकेत ११५ सदस्य आहेत. बहुमतासाठी ५८ नगरसेवक लागतात. मागील ३४ वर्षांपासून महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. प्रत्येक महापौर, उपमहापौर निवडणुकीत युतीला अपक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत. युतीला औरंगाबादकरांनी कधीच स्पष्ट बहुमत दिले नाही. प्रभाग पद्धतीत होणाऱ्या निवडणुकीत अपक्ष निवडून येण्याची शक्यता कमी आहे. 

महाशिवआघाडीला फायदा
प्रभाग पद्धतीत महाशिवआघाडीला जास्त फायदा होईल, असा अंदाज आहे. अनेक प्रभागांमध्ये या तिन्ही पक्षांचा मुकाबला फक्त भाजपसोबत राहील. मुस्लिमबहुल भागात एमआयएमसोबत मुकाबला करावा लागले. प्रभाग पद्धतीत तीन हिंदुबहुल भागाला एक मुस्लिमबहुल भाग  आल्यास महाशिवआघाडीची सत्ता एकहाती येऊ शकते. काही प्रभागांमध्ये असे समीकरणही जुळत असल्याचे कळते.

महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना    - २९
भाजप    - २३
एमआयएम    - २३
काँग्रेस    - १२
अपक्ष    - १८
बीएसपी    - ०४
राष्ट्रवादी    - ०४
रिपाइं (डी)    - ०२
एकूण    - ११५

महाशिवआघाडी होऊ शकते
सध्या प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महाशिवआघाडी करण्यासंदर्भात विचार होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन ही निवडणूक लढविल्या जाऊ शकते.
- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख शिवसेना

Web Title: The possibility of a 'Mahashivaaghadi front' even in municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.