औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथा-पालथींची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 11:38 AM2019-09-05T11:38:30+5:302019-09-05T11:51:38+5:30
‘युती होते की तुटते’ यावर पक्ष बदलण्याचा निर्णय
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघण्याच्या वाटेवर आहे. येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या उलथा-पालथीची शक्यता आहे. युती आणि आघाडीच्या गोळाबेरजेवरच सगळी राजकीय गणितं अवलंबून असून, येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चितच मोठे राजकीय आदान-प्रदान होणे शक्य आहे. काँग्रेसचे माजी आ. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय चर्चांचा बाजार गरम झाला आहे. कन्नड, फुलंब्री, गंगापूरमधून मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
फुलंब्रीचे काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सोशल मीडियातून होत आहे. कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्यासह आणखी एक काँग्रेसचे माजी आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तसेच कन्नडमधील एक-दोन नगरपालिका सदस्यांनीदेखील शिवसेनेशी संपर्क सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून भाजपचे किशनचंद तनवाणी यांचा शिवसेना प्रवेश सोशल मीडियाने घडवून आणला होता; परंतु प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. तनवाणी हे भाजपमध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या प्रवेशाच्या बातम्यांना ब्रेक लागला आहे.
कल्याण काळे यांचे स्पष्टीकरण असे
कृष्णा पा. डोणगावकरांनी महिनाभरापूर्वी मला विचारणा केली होती. काय चालले आहे, त्यांनी विचारले, मी त्यांना आमची तयारी सुरू असल्याचे सांगितले होते. उलट युती झाल्यावर डोणगावकर तुमचे काय होणार, असेही मी त्यांना त्यावेळी विचारले होते. कालपर्यंत भाजपच्या नावाने बुक केले होते, आता शिवसेनेच्या नावाने बुक केले जात आहे; परंतु मी आहे तेथेच आहे. शिवसेना-भाजप एकत्र लढल्यावर आमचा मतदारसंघ भाजपला जाणार आहे. मी भाजपत जाणार असे एखादा म्हटला असता तर मी समजू शकलो असतो. लोकसभेच्या वेळीही मी काँग्रेस सोडणार अशी राजकीय पुडी अंदाज बांधणाऱ्यांनी सोडली होती. या चर्चांना काहीही अर्थ नाही.
हर्षवर्धन जाधव म्हणाले, मला ऑफरच नाही
कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव म्हणाले, मला तर अजून कुठल्याही पक्षाची आॅफर नाही. कन्नड भाजपला सुटेल अशी चर्चा आहे. काहीपण होऊ शकते, कारण अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले. त्यामुळे सिल्लोड सेनेला आणि कन्नड भाजपला, अशी पण चर्चा आहे. बघू या काय होते ते, सध्या तरी शिवस्वराज्य बहुजन पक्षात आहे. कुणाची ऑफर आली तर विचार करू. महाराष्ट्र सगळा एका बाजूने कलला आहे. भविष्यात मतदारसंघात विकासकामे करायची झाल्यास सरकार पाठीशी लागेल. त्यामुळे मतदारसंघाच्या दृष्टीने हिताचे निर्णय घ्यायचे झाल्यास घेऊ. मात्र, सध्या कुणाचीही आॅफर नाही आणि मी देखील कुणाशी संपर्क केलेला नाही.